(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाटण्याच्या पोलीस अधीक्षकांना क्वॉरन्टाईन केल्याचं कारण बीएमसीने सांगितलं
पाटण्याचे एसपी विनय तिवारी 2 ऑगस्टला दुपारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर मुंबई महापालिकेने रात्री अकरा वाजता त्यांना होम क्वॉरन्टाईन केलं. यावरुन वादाला सुरुवात झाल्यानंतर बीएमसीने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बिहारहून मुंबईत पोहोचलेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने होम क्वॉरन्टाईन केलं. यानंतर बरीच चर्चा रंगू लागली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेनेही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तिवारी यांचं होम क्वॉरन्टाईन नियमानुसारच असून देशांतर्गत विमान प्रवास केल्याने पाटणा एसपी यांना होम क्वॉरन्टाईन केल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं. तिवारी यांना गृह अलगीकरणाची सविस्तर माहिती दिली होती. अलगीकरणातून सूट देण्यासाठी मुंबई महापालिका तयार आहे, मात्र त्यासाठी नियमानुसार अर्ज करणं गरजेचा असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं.
पाटण्याचे एसपी विनय तिवारी रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर मुंबई महापालिके त्यांना गोरेगावमधील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये असलेल्या गेस्टरुममध्ये क्वॉरन्टाईन केलं. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यांचा क्वॉरन्टाईनचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत असेल.
मुंबईने माणुसकी गमावली, राहण्यासाठी सुरक्षित नसल्याची भावना : अमृता फडणवीस
यावरुन मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते विनोद मिश्रा, भाजप नेते राम कदम, किरीट सोमय्या यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. यानंतर मुंबई महापालिकेने या संपूर्ण प्रकारावर स्पष्टीकरण दिलं आहे. बीएमसीने म्हटलं आहे की, "महापालिकेच्या पथकाने बिहारहून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असलेली गृह अलगीकरण बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य शासनाच्या 25 मे रोजीच्या आदेशानुसार देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यामध्ये गृह अलगीकरणाचाही समावेश आहे. त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. नियमावलीनुसार गृह अलगीकरणातून सूट मिळवण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणं गरजेचं आहे. याची माहितीही त्यांना देण्यात आली आहे.
दरम्यान महापालिकेने विनय तिवारी यांचं होम क्वॉरन्टाईन नियमानुसार असल्याचं म्हटलं असलं तरी आधी आलेल्या अधिकाऱ्यांना होम क्वॉरन्टाईन का केलं नाही असा प्रश्न विचारला जात आहे. तसंच विनय तिवारी यांच्यासह विमानातील इतर सहप्रवाशांना होम क्वॉरन्टाईन केलं आहे का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित बातम्या