भावाच्या काळजीपोटी बहिण दवाखान्यात! पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट; म्हणाल्या, मी बहिण आहे...
Pankaja Munde Meets Dhananjay Munde : राजकीय पटलावर एकमेकांवर आसूड ओढणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संकटकाळात एकमेकांच्या सोबत असतात याची पुन्हा प्रचिती आली आहे.
Pankaja Munde Meets Dhananjay Munde : राजकीय पटलावर एकमेकांवर आसूड ओढणारे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे संकटकाळात एकमेकांच्या सोबत असतात याची पुन्हा प्रचिती आली आहे. पंकजा मुंडे आज भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला ब्रीच कॅण्डीत दाखल झाल्या. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अपघातात जखमी झाले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja MUnde) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार , माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात ही राजकीय संस्कृती
पंकजा मुंडे या भेटीनंतर बोलताना म्हणाल्या की, आज तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आले होते. त्यांची तब्येत बरी आहे. मी बहीण आहे आणि मागे देखील धनंजय मुंडे अॅडमिट होते. तेव्हा मी भेटायला आली होती. मी तर बहीण आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात ही राजकीय संस्कृती आहे, असं त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर
धनंजय मुंडे यांच्या अपघातानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या छातीमध्ये किरकोळ मार असून ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत कोणत्याही प्रकारचे काळजीचे कारण नसल्याचे कळविण्यात आले आहे.
कसा झाला धनंजय मुंडेच्या गाडीचा अपघात?
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. परळी शहरातील काही नागरिकांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत होते. त्यानंतर साडेअकरा वाजता रात्री परळी शहरात आले. परळीहून आपल्या राहत्या घरी रवाना झाले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास धनंजय मुंडे यांची त्यांची बीएमडब्ल्यू (BMW) त्यांच्या घराजवळ असलेल्या मौलाना आझाद चौकामध्ये आली. यावेळी चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातामध्ये बीएमडब्ल्यू कारचा पुढच्या भागाच मोठं नुकसान झालं आहे.
दिग्गज नेत्यांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट
धनंजय मुंडे हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आस्थावाईक पणे चौकशी करत पुढील उपचाराबाबत रुग्णालय प्रशासनास सूचना करत धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्याबाबत सदिच्छा व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला मध्यरात्रीनंतर मतदारसंघातील दौरा आटपून परळीकडे जात असताना अपघात झाला. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले होते. दरम्यान धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील उपचार घेत आहेत.