कसं काय शेलार बरं हाय का? भाजप कार्यालयासमोरील आक्षेपार्ह पोस्टरमुळे वाद पेटण्याची शक्यता
Poster Against Ashish Shelar : भाजप कार्यालयाबाहेर भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
Poster against BJP leader Ashish Shelar by unknown person : भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयासमोर मध्यरात्री काही अज्ञातांनी आक्षेपार्ह पोस्टर लावले आहेत. ही पोस्टर नेमके कोणी लावले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
या पोस्टवर आशिष शेलार यांच्या फोटोचे विडंबन करण्यात आले आहे. त्याशिवाय, एका गाण्याचे विडंबन करण्यात आले आहे. कसं काय शेलार बरं हाय का? असे विचारत काल तुम्ही किशोरी ताईंचा अपमान केला म्हणे, असं विचारत शेलार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे. भाजप कार्यालयासमोरच थेट अशा प्रकारची पोस्टरबाजी करण्यात आल्याने याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ: भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात टीका करणारे आक्षेपार्ह पोस्टर
महापौरांना धमकीचे पत्र
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिली आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ देखील करण्यात आली आहे. महापौर आणि सगळ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे वाकड्या नजरेनं बघू नका, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे. हे पत्र पनवेलमधून कुरिअरद्वारे आलेलं आहे.
काय आहे प्रकरण?
30 नोव्हेंबर रोजी वरळी येथील बी. डी. डी. चाळीत गॅस सिलेंडर्सचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील चार जण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी नायर रूग्णालयात दाखल केले होते. यावेळी जखमी बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांचाही मृत्यू झाला. या घटनेबाबत 4 डिसेंबर रोजी भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि मुंबई महानरपालिकेवर टीका केली होती. याच पत्रकार परिषदेत महापौर पेडणेकर यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. शेलार यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती.
महिला आयोगानेही घेतली दखल
आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतर राज्य महिला आयोगाकडून आशिष शेलार यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Kishori Pednekar : स्त्रियांच्या लज्जास्पद भागांचा उल्लेख, माझ्या अवयवांची विटंबना करण्याची धमकी, संताप आणि रागाने महापौरांचे डोळे पाणावले
- Ashish Shelar : महापौरांबाबत अपमानास्पद वक्तव्य प्रकरण; गुन्हा रद्द करण्यासाठी आशिष शेलारांची हायकोर्टात धाव