आता ठाकरे सरकारच्या अडचणी वाढतील, भाजप आमदार नितेश राणे यांचा इशारा
पुणे पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी केली आहे. या संदर्भात नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : पुणे पोलिसांकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणेंविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. कंपनीकडून घेतलेलं 65 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे. डीएचएफएलकडून (DHFL) घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता आमच्या नाही तर ठाकरे सरकारच्या अडचणी वाढतील, असा इशारा नितेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.
नितेश राणे काय म्हणाले?
लूकआऊट सर्क्युलर म्हणजे एअरपोर्ट प्रशासनाला त्यांनी मी आणि माझी आई देश सोडू जाऊ शकतात असं सांगितलं आहे. हे सर्क्युलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण, आमचं डीएचएफएलचं खातं आहे ते मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाराने पुणे पोलिसांना हे सर्क्युलर काढण्याचा अधिकार राहतो? असा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. पाच महिन्याअगोदर आम्ही संबंधित बँकेला आम्हाला कर्ज सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलं आहे. त्यानंतर असे सर्क्युलर निघत असेल तर आम्ही पाठवलेल्या पत्रांचा उपयोग काय? त्यामुळे या प्रकरणाला आम्ही हायकोर्टात आव्हान देऊ. माध्यमांमध्ये राणे कुटुंबीय अडचणीत असं चालवलं जात आहे, ते चुकीचं आहे, आमची काहीच अडचण झालेली नाही. आता पुणे क्राईम ब्रांचची अडचण होणार आहे. आता महाविकास आघाडी सरकारची अडचण होणार आहे, असा इशाराच नितेश राणे यांनी दिलाय.
नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी, कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप
नंदकुमार चतुर्वेदी चार महिन्यापासून गायब, त्याची चौकशी कधी? : राणे
आम्ही पाच महिने अगोदरच कर्ज फेडणार असल्याचं पत्र संबंधित बँकेला दिलं आहे. आम्ही ठाकरे सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करत असल्याने आमच्या विरोधात कारवाई होत असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. नंदकुमार चतुर्वेदी चार महिन्यापासून गायब आहे, त्याच्यासाठी लुकआऊट नोटीस काढा. चतुर्वेदी आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचा काय संबंध आहे? त्याचीही चौकशी करा. या संदर्भातील माहिती मी काही दिवसातच पत्रकार परिषदेतून देणार आहे, माझ्याकडे काही कागदपत्रे आहेत. म्हणून अडचणी आमच्या वाढणार आहेत की ठाकरे सरकारच्या हे येणारा काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.