Nitin Gadkari : मतदार हुशार झालाय, घराघरात एक-एक किलो सावजीचं मटण वाटलो, तरीही आम्ही निवडणूक हरलो: नितीन गडकरी
Nitin Gadkari On Election: मतदार खूप हुशार आहे, सर्वांनी दिलेलं तो खातो, पण ज्याला मत द्यायचं त्यालाच देतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
मुंबई: आता मतदार खूप हुशार झाला आहे, त्याला माहिती आहे नेमकं काय करायचं, आम्ही एकदा प्रत्येक घरात एक-एक किलो सावजीचं मटण वाटलं, तरीही निवडणूक हरलो... हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे. निवडणुका प्रलोभनेने जिंकल्या जात नाहीत, तर लोकांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करून जिंकल्या जातात असंही ते म्हणाले. रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात नितीन गडकरी (Nitin Gadkari On Election) बोलत होते.
मतदार खूप हुशार आहे, सर्वांनी दिलेलं तो खातो, पण ज्याला मत द्यायचं त्यालाच देतो असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कार्यक्रमात गडकरी निवडणूक कशा प्रकारे जिंकली जाते याचे मार्ग सांगत होते. यावेळी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. गडकरी म्हणाले की, निवडणुका प्रलोभनेने जिंकल्या जात नाहीत, तर लोकांच्या मनात विश्वास आणि प्रेम निर्माण करून जिंकल्या जातात. एकदा आम्ही प्रत्येक घरात एक एक किलो मटण वाटलं, पण निवडणूक हरलो कारण आजचा मतदार खूपच जागरूक झाला आहे. त्याच्या मनात जर तुम्ही विश्वास निर्माण केला तर तो तुमची जात, धर्म, भाषेच्या वरती जावून तुमच्यावर प्रेम करतो. त्याला कुठलेही पोस्टर द्यायची गरज नाही, आमिष दाखवायची गरज नाही. हा दीर्घकालीन उपाय आहे.
निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी मोठमोठे होर्डिंग्ज लावले जातात, उमेदवार मतदारांना पैसे देतात, पण लोकांमध्ये विश्वास निर्माण करूनच निवडणुका जिंकल्या जातात, असे माझे मत आहे असं नितीन गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari On Election: खासदारकी आमदारकी मागणारे शेवटी शाळा तरी द्या म्हणतात
नितीन गडकरी म्हणाले की, अनेक लोक आपल्याकडे येतात आणि खासदारकी मागतात, ते नाही तर आमदारकी तरी द्या म्हणतात. नाहीतर विधानपरिषदेवर घ्या, हे नाही तर कमिशन द्या, मेडिकल कॉलेज द्या. नसेत तर इंजिनीअरिंग कॉलेज किंवा बी.एड. मला कॉलेज द्या अशी मागणी करतात. तेही नाही तर कॉलेज किंवा प्राथमिक शाळा तरी द्या म्हणतात. त्यातून शिक्षकांच्या पगारातील अर्धा पगार त्यांना मिळतो. पण हे केल्याने देश बदलत नाही.
जे लोक सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांनी दीर्घकालीन उपायांवर काम करावं असा सल्लाही नितीन गडकरी म्हणाले. नोकरी मागणारे होऊ नका, नोकरी देणारे व्हा. नोकरीत काही ठेवलं नाही. नाविण्यतेवर काम करा असाही सल्ला गडकरींनी यावेळी दिला.
ही बातमी वाचा: