शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मागितली लाच; महसूल अधिकारी रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात
सातबारा उताऱ्यावर पत्नीचं नाव चढवून त्याची फेरफार नोंद घेण्यासाठी केसलवाडा येथील तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रकरण भंडारा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आलं होतं

भंडारा : राज्यात गेल्या काही महिन्यात लाचखोर (Bribe) अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहात अटक होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीतील एका महिला क्रीडा अधिकाऱ्यासही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. तर, चंद्रपूर जिल्ह्यात चक्क तहसीलदाराने शेतकऱ्याकडे 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तेव्हा, एसीबीच्या पथकाने तहसीलदारास रंगेहात अटक केली होती. आता, भंडाऱ्यात (Bhandara) तीन हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सातबारा उताऱ्यावर फेरफारनुसार नोंद घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. मात्र, शेतकऱ्याच्या प्रसंगावधानेनं कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला.
सातबारा उताऱ्यावर पत्नीचं नाव चढवून त्याची फेरफार नोंद घेण्यासाठी केसलवाडा येथील तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून प्रकरण भंडारा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठविण्यात आलं होतं. या अर्जाची योग्य दुरुस्ती करण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी सुनील लोहारे (45) यांनी तक्रारदार यांना 3 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, शेतकऱ्याने लाच न देता भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला असता, लाचलुचपत विभागाच्या पथकानं सापळा रचून 3 हजारांची लाच रक्कम स्वीकारताना कार्यालयातचं संबंधित अधिकाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
रायगड, बार्शीतही अडकले लाचखोर कर्मचारी
दरम्यान, गेल्याच आठवड्यात रायगड जिल्ह्यात 5 हजारांची लाच घेताना ग्रामसेवकला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाच (Bribe) लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ग्रामसेवकाला ताब्यात घेतलं. ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव यांनी घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. पेण तालुक्यातील मळेघर ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून एसीबीने परमेश्वर यांस रंगेहाथ अटक केली. त्यांच्यावरील कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही दोन महसूल कर्मचाऱ्यांविरुद्ध लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती.
हेही वाचा
2 माजी आमदार अन् माजी मंत्र्यांचा केल भाजपात; बावनकुळे म्हणाले, लवकरच काँग्रेसमधून 2 मोठे प्रवेश
















