चैत्री यात्रेत श्री विठुरायाच्या चरणी 2 कोटी 56 लाखांचं दान, लाखोंच्या संख्येनं भाविकांनी घेतलं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या (Pandharpur Shri Vitthal) चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येत असतात.
सोलापूर : महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या (Pandharpur Shri Vitthal) चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक येत असतात. नुकतीच चैत्री यात्रा पार पडली. यावेळी देखील भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं. या कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी भरभरुन दान अर्पण केले आहे. देवाच्या खजिन्यात तब्बल 2 कोटी 56 लाख रुपये जमा झाले आहेत. मंदीर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पुजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून हे उत्पन्न मंदिर समितीस मिळाले आहे.
चैत्री यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. चैत्र शुध्द 01 (दिनांक 30 मार्च) ते चैत्र शुध्द 15 (दिनांक 12 एप्रिल) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 25,59,092 रुपये अर्पण, 63,99,779 रुपये देणगी, 26,21,000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 34,34,708 रुपये भक्तनिवास , 29,22,100 पुजेच्या माध्यमातून, 64,85,204 रुपये हुंडीपेटी , 164774 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 10,68,398 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. 2024 च्या चैत्री यात्रेत रू. 1,26,73,788/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 2,56,55,055/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू.1,29,81,267/- इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
वर्षातील प्रमुख चार वाऱ्यांपैकी एक म्हणजे चैत्रीवारी
आषाढी, कार्तिकीसह वर्षातील प्रमुख चार वाऱ्यांपैकी एक चैत्रीवारी गणली जाते. या वारीसाठी गेल्या पंढरपुरात वारकऱ्यांची यावेळी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील विविध मंदिर, धर्मशाळा, मठांमधून भजन, कीर्तन आणि प्रवचने रंगली होती. दशमीच्या स्नानासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांची गर्दी चंद्रभागा नदीवर झाली होती. चंद्रभागेतील स्नान झाल्यानंतर वारकरी थेट दर्शनरांगेकडे जात होते. काहीजण मुखदर्शन घेऊन बाहेर पडत होते, तर काहीजण प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा पूर्ण करून समाधान मानत होते. शहरातील प्रमुख मार्गावरही वारकऱ्यांसह विविध दिंड्यांकडून भजनातून ज्ञानोबा तुकारामचा..जयघोष करत होत्या. तापमानाचा पारा तब्बल 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला असताना देखील भाविक भक्त मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी दर्शनरांगेत प्रामुख्याने पंखा, कुलरची व्यवस्था केली होती. याशिवाय भाविकांना पायांना खडे टोचू नयेत, यासाठी मॅटचाही वापर केला होता. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पाणी, चहा आणि फराळाचे वाटपही करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या:























