(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Drink and Drive : न्यू ईयर सेलिब्रेशनमध्ये झिंगाट, ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी मुंबई पोलिसांकडून 229 तळीरामांवर कारवाई
Mumbai Police Drink and Drive : नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने झिंगाट होऊन वाहन चालवणाऱ्या 229 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात आली.
Mumbai Police Drink and Drive : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी (New Year Celebration) घराबाहेर पडलेल्या 229 तळीरामांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह (Drink And Drive) करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करताना कुठेही गालबोट लागू नये, कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात वाढ झाली. मागील वर्षी जवळपास 156 जणांवर कारवाई करण्यात आली होती.
नववर्षाच्या निमीत्ताने सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडलेल्याा वाहन चालकांवर वाहतूक नियमांच उल्लंघन केल्याने मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई पोलिसांनी ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत 229 जणांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर निमित्ताने112 ठिकाणी नाकेबंदी केली होती. तर, 2410 जणांवर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्याशिवाय, विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्या 320 आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या 80 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी बंदोबस्ता दरम्यान एकूण 9025 वाहने तपासण्यात आली.
बंदोबस्तासाठी 12 हजार अधिकारी-कर्मचारी
मुंबई पोलीस आयुक्त तसेच विशेष पोलीस आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बंदोबस्ताकरीता रस्त्यावर उतरले होते.
सर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त, 22 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 450 पोलीस निरीक्षक, 1601 इतर अधिकारी आणि 11500 पोलीस अंमलदार मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात होते.
मीरा-भाईंदर,वसई-विरार हद्दीत 104 जणांवर कारवाई
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयु्क्तालयाच्या वाहतूक पोलिसांकडून थर्टी फस्ट साजरी करताना, दारु पिवून गाडी चालवणा-या 104 तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरीक मोठ्या प्रमाणावर थर्टी फस्ट राञी जल्लोषात साजरी करत असतात. त्याकरिता बरेच नागरिक रात्री उशिरा रस्त्यावर येत असल्याने मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये वाहतूक पोलिसांनी शहराच्या नाक्यानाक्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. यासाठी 5 पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 225 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी आणि 700 पेक्षा जास्त पोलीस अंमलदार, 248 वाहतूक पोलीस, 400 महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी नेमण्यात आले होते. शहरात 50 पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.