चहा विकणाऱ्या मोदींनी देश विकू नये : भुजबळ
23 वर्ष बेस्टचा कारभार शिवसेनेकडे आहे, पण त्यांना तेथील कमगारांना न्याय देता आला नाही. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना जे समाधानी करु शकत नाहीत, ते राज्यातील लोकांना काय समाधान देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वयाएवढे पेट्रोलचे भाव झाले आहेत. आता एमडीएचच्या मसालेवाले काकांच्या वया एवढे हे भाव वाढविण्याचे प्रयत्न भाजपाचे सुरु आहेत. यानिमित्ताने चहा विकत असलेल्या मोदींनी देश विकू नये अशी कडवट टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील चौकात आयोजित सभेत भुजबळ बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते. ज्या रिलायन्स कंपनीने खेळण्यातील विमान बनविले नाही, त्याला राफेलचे विमान बनवायला देत आहेत. मात्र सरकारच्या कंपण्यांना काम देत नाहीत. आम आदमी के साथ मन की बात मात्र अदानी-अंबानी के साथ धन की बात, असे या सरकारचे नवीन फंडे आहेत. मला का तुरुंगात टाकले मला कळले नाही आणि ज्यांनी टाकले त्यांनाही कळले नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
23 वर्ष बेस्टचा कारभार शिवसेनेकडे आहे, पण त्यांना तेथील कमगारांना न्याय देता आला नाही. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना जे समाधानी करु शकत नाहीत, ते राज्यातील लोकांना काय समाधान देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शहरी भागात सातत्त्याने लोक शिवसेनेला निवडून देतात. एकदा आम्हाला निवडून द्या मग बघा आम्ही काय करतो, असं आवाहनही भुजबळांनी जनतेला केलं.
शिवसेना आणि भाजपा एकाच नाण्याच्या बाजू आहेत. खोटे बोलायचे आम्हाला जमत नाही. लोकांना झुलवत ठेवायचे आणि काहीच करायचे नाही, अशी त्यांची कारभाराची पद्धत आहे. बाळासाहेब ठाकरे जाऊन किती वर्ष झाले पण बाळासाहेबांचे स्मारक कधी करणार याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. पण निवडणुका आल्या की यांना श्रीराम आठवतात, अशी टीका भुजबळांनी शिवसेनेवर केली.























