मलिक म्हणतात, पंतप्रधान मोदी आमचे गुरू, आम्ही त्यांचे शिष्य!
Nawab Malik on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे गुरू असून आम्ही त्यांचे शिष्य आहोत असा उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला.
Nawab Malik on PM Modi : राजकारणातील गुरू शिष्याच्या जोडींबाबत अनेक चर्चा रंगतात आणि त्याची उदाहरणे दिली जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपले गुरू असल्याचे वक्तव्य केले होते. काही वर्षापूर्वी केलेल्या वक्तव्याची आजही चर्चा सुरू असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी हे आमचे गुरू असून आम्ही त्यांचे शिष्य असल्याचे उपरोधिकपणे म्हटले. आज, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणेकडून पाळत ठेवली जात असल्याचे आरोप केले. त्यानंतर नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर आरोप करण्याऐवजी पोलिसांकडे तक्रार करावी असे ट्वीट भाजप नेत्यानी केले. त्याला उत्तर देताना मलिक यांनी हे वक्तव्य केले. सोशल मीडियावर भाजपचे वस्त्रहरण होत असल्याने भाजप नेत्यांना आता भीती वाटत असल्याचे मलिक यांनी म्हटले.
नवाब मलिक यांनी म्हटले की, सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला शिकवले. आता ह्याच सोशल मीडियाचा वापर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. भाजपने सोशल मीडियात मक्तेदारी निर्माण केली होती. आता त्यांच्या या मक्तेदारीला आव्हान मिळत असल्याचे मलिक यांनी म्हटले. भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर खोटं बोलून वर्ष 2014 मध्ये सत्ता हस्तगत केली होती. आता मागील सात वर्षात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनीदेखील सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. सोशल मीडियावर भाजपला जोरदार प्रत्युत्तर मिळत असून त्यांनी तयार केलेल्या आखाड्यात त्यांना मात दिली जात आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप नेत्यांचे वस्त्रहरण होत असल्याने त्यांना भीती वाटत असल्याचे मलिक यांनी म्हटले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एक खळबळजनक आरोप केला आहे. माझ्यावर अनेक षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे माझ्यावर देखील आरोप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत जो खेळ झाला तो माझ्यासोबत केला जात आहे, असं मलिक म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तक्रार करणार
मलिक यांनी म्हटलं की, अनिल देशमुख यांच्याप्रमाणे मला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे. तसे पुरावेचं माझ्या हातात लागले आहेत. काही अधिकारी लोकांना माझ्या विरुद्ध मसुदा तयार करून इमेल करत आहेत. आणि त्यांना माझ्या विरुद्ध तक्रार करायला लावत आहेत. त्यामुळे मी याविरोधात मी कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील तक्रार करणार आहे. आशा तक्रारींची चौकशी करायला लावणार आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडिओ: नवाब मलिक यांची पत्रकार परिषद
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Nawab malik : कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतं, मलिकांचा राणेंना टोला
Nawab Malik : माझी रेकी केली जातेय, नवाब मलिकांनी फोटो पोस्ट करत केलाय दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha