(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Worli Bandh: महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्याचे मुंबईतही पडसाद; आज वरळी बंदची हाक
Mumbai Worli Bandh: महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्याचे पडसाद आता पुण्यापाठोपाठ मुंबईतही. आज मुंबईत वरळी बंदची हाक.
Mumbai Worli Bandh: महापुरुषांसंदर्भात सातत्यानं होणाऱ्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात पुण्यापाठोपाठ आता मुंबईतील वरळीतही बंदची हाक (Worli Bandh) देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात आज मुंबईतील (Mumbai News) वरळी परिसरात बंद पाळला जाणार आहे. वरळीतील आंबेडकरवादी आणि इतर संघटनांनी बंद पुकारला आहे. हा एकदिवसीय बंद असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत केला जाणार आहे. दरम्यान, या बंदच्या पार्श्वभूमीवर वरळीकरांकडून बंदचे पोस्टर्सही सोशल मीडियावर व्हायरल केले जात असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील (Mumbai News) वरळी परिसरात आंबेडकरवादी आणि बहुजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटनांसह छोटे पक्ष आणि वरळीकर जनता यांच्या वतीनं आज वरळी बंद पाळण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार विरोधात आज बंद करण्यात येणार आहे. हा एक दिवसीय बंद सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत करणार आहे. महाविकास आघाडीकडून 17 तारखेला आंदोलन केलं जाणार आहे. त्या अगोदर वरळीत हा बंद असणार आहे.
राज्यात महापुरुषांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सोशल मीडियावरही वादग्रस्त वक्तव्यांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर राज्यपालांना पदावरुन हटवण्याचीही मागणी करण्यात आली. याच वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुणे बंदची हात देण्यात आली होती. आता त्यापाठोपाठ वरळी बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, वरळी परिसर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे या वरळी बंदच्या पार्श्वभूमीवर आंदोलन केल्यास आदित्य ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.