Mumbai Traffic Updates: मुंबईत अंधेरीमधील गोखले पूल आजपासून बंद, पर्यायी वाहतुकीसाठी सहा मार्गांची व्यवस्था
Mumbai Traffic Updates: अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
Mumbai Traffic Updates: अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा (Andheri Connector Bridge) गोखले पूल (Gokhale Road Bridge) पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल आज 7 नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Traffic Police) याबाबतचे आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका (BMC) आणि मुंबई पोलिसांनी या पुलाची पाहणी केली होती. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम (Andheri East and Andheri West) दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात रहदारी असणाऱ्या मार्गांपैकी एक आहे.
मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी 6 पर्यायी मार्ग दिलेले आहेत.
- खार सबवे, खार
- मिलन सबवे उड्डाणपूल, सांताक्रूझ
- कॅप्टन गोरे उड्डाणपूल (विलेपार्ले उड्डाणपूल), विलेपार्ले
-अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई
- बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, जोगेश्वरी
- मृणालताई गोरे उड्डाणपूल, गोरेगाव
पर्यायी मार्गांबाबत टीका
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी गोखले रोड पूल वाहतुकीसाठी बंद होत असल्याने मुंबई पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गाबाबत वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पर्यायी मार्गांमुळे वाहतुक कोंडीत भर पडणार असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे. अंधेरी सबवे मार्ग हा गोखले रोड पुलावर असलेल्या क्षमते इतकी वाहतूक करण्यास असमर्थ असल्याचा सूर उमटत आहे. त्याशिवाय, विलेपार्ले स्थानकाजवळील कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल लहान असून हा मार्ग रस्ते अरुंद गल्ल्यांतून जातात. या मार्गालगत शाळा, निवासी इमारती आहेत. त्यामुळे येथून वाहतूक वळवल्यास आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोखले पूल बंद झाल्यानंतर विलेपार्ले ते जोगेश्वरी दरम्यानची संपूर्ण वाहतूक कोलमडून पडेल, अशी भीती स्थानिकांना आहे.
पुलाची पुनर्बांधणी का?
जुलै 2018 मध्ये गोखले रोड पुलाचा एक भाग कोसळला होता. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय पश्चिम रेल्वेवरील वाहतूक कोलमडली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिकेने शहरातील पुलांच्या सुरक्षितेसाठी ऑडिट केले. आयआयटी-मुंबईद्वारे शहरातील पुलांचे ऑडिट करण्यात आले होते. पुलाचा एक भाग कोसळल्यानंतरही गोखले रोड पूल अंशत: वाहतुकीसाठी खुला होता. पूर्ण क्षमतेने वाहतूक होत नसल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. मात्र, आता, कालांतराने पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.