(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Temperature: मुंबईसह ठाण्यात वाढल्या उन्हाच्या झळा! या वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद; कुठं किती तापमानाची नोंद?
Mumbai Temperature News : मुंबईमध्ये आज 2024 या वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली असून आगामी दोन ते तीन दिवसात मुंबईतील तापमान चाळिशीच्या जवळपास राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
Mumbai Temperature News : मुंबईमध्ये आज 2024 या वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. मुंबईमधील (Mumbai News) आज किमान तापमान 38.8 अंश सेल्सिअसवर असल्याचे नोंदविण्यात आलंय. येत्या दोन ते तीन दिवसात मुंबईतील तापमान चाळिशीच्या जवळपास राहण्याचा अंदाज देखील प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे देखील तापलेले असून आज 38. 6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रामध्ये सध्या गुजरात वरती अँटी सायक्लोनची निर्मिती होत असून त्यामुळे पश्चिम ऐवजी पूर्व बाजूने वाऱ्यांचा वेग दिसतो आहे. ज्यामुळे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक केंद्रने दिली आहे. पूर्वेकडील प्रवाहामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता
राज्यातील तापमानात (Temperature) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतही (Mumbai) उन्हाचा चटका वाढला असून त्यामुळं मुंबईकरांची काहीली होत आहे. दरम्यान, आज (21 मार्च) मुंबईत 2024 या वर्षातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली आहे. काल मुंबईतील तापमानाचा पारा हा 38.07 अंश सेल्सिअसवर गेला होता. तर आज त्यात पुन्हा वाढ झाली आहे. अशातच पुढील दोन ते तीन दिवसात मुंबईत तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई सोबतच ठाणे आणि कुलाब्यात देखील कमाल तापमान तापले आहे. कुलाब्यात आज कमाल तापमान 36.3 अंश सेल्सिअसची असल्याची नोंद झाली आहे. तर सांताक्रुज केंद्रावर 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची आज नोंद करण्यात आली आहे.
एल निनोचा प्रभाव कमी होणार
प्रशांत महासागरातील एल निनोचा (El Nino) प्रभाव कमी होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान एल निनोचा (El Nino) प्रभाव कमी होण्याची शक्यता अमेरीकी हवामान संस्थेच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरी पेक्षा जास्त म्हणजेच 94 टक्के पावसाची (Rain) नोंद होण्याची शक्यताही अमेरिकेतील हवामान विभागाने वतीने वर्तवली आहे. मात्र, या बाबत भारतीय हवामान विभाग (IMD) काय भाष्य करते हे पाहणे महत्वाचे ठरणार असले तरी, या बातमीमुळे पावसाबाबतची शेतकऱ्यांची चिंता काही अंशी का होईना मिटल्याचे बघायला मिळत आहे.
देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाचा अंदाज
पुढील महिन्यापासून प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी होईल अशी स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्वत्र हवामानाची स्थिति न्यूट्रल होणाची दाट शक्यता आहे. परिणामी देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद होणार असल्याची देखील माहिती अमेरिकेच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. जगभरात जेव्हा जेव्हा एल निनोची स्थिती ही सामान्य राहते, तेव्हा देशात चांगला पाऊस झाल्याचे बघायला मिळाले आहे. गेल्या वर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर मान्सूनच्या शेवटाला एल निनोचा प्रभाव अनुभवायला मिळाला होता. त्यामुळे देशात आणि राज्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती.
मात्र, आगामी जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये पावसाची चांगली परिस्थिती बघायला मिळणार असल्याने देशातील शेतकऱ्यांची चिंता काही अंशी कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी भारतीय हवामान विभाग याविषयी काय भाष्य करते हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र एकीकडे जागतिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली ही स्थिती शेतकऱ्यांसाठी काही अंशी दिलासादायक ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या