शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai News: मुंबई दादर छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाची दयनीय अवस्था झाल्याची बाब समोर आली आहे.
Mumbai Shivaji Park News: मुंबईतील (Mumbai News) अनेक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे, शिवाजी पार्क (Shivaji Park). समुद्र किनारा, भलं मोठ्ठ मैदान आणि त्याच मैदाना अश्वारूढ शिवरायांचा पुतळा ही येथील प्रमुख आकर्षण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नावावरुन या मैदानाचं आणि कालांतरानं परिसराचं नाव शिवाजी पार्क पडल्याचं सांगितलं जातं. हेच मैदान अनेक राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी देखील राहिलं आहे. पण, शिवाजी पार्क मैदानातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या समोरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीलाच भगदाड पडलं आहे. या शिल्पाच्या तळाकडील भिंतीच्या लाद्या उखडल्या असून इथं घाणीचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई दादर छत्रपती शिवाजी पार्क मैदानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाची दयनीय अवस्था झाल्याची बाब समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाला भगदाड पडलं आहे. तर, शिल्पावर मातीचा थर साचला आहे. या भगदाडात घाण, बाटल्यांचा कचरा साचला आहे. तसेच, या मैदानात येणाऱ्या शिवप्रेमी आणि खेळाडूंनी देखील या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे.
शिवाजी पार्क गेल्या अनेक दशकांपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. याच मैदानानं याचि देही याचि डोळा अनेक घडामोडी पाहिल्या. तसेच, हे मैदान अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदारही आहे. पण, याच मैदानात असलेल्या अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीलाच मोठं भगदाड पडल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, याचं बांधकाम सार्वजनिक विभागानं केलं आहे. तर, देखभाल मुंबई महानगरपालिकेकडे आहे. पण, या शिल्पाच्या झालेल्या दयनिय अवस्थेकडे प्रशासनानं सपशेल दुर्लक्ष केलं आहे.