Mumbai Rain : रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी, महापालिकेच्या सूचना जारी
वारंवार आवाहन करुनही रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईकर समुद्रकिनारी फिरायला आणि पोहायला जातात असं महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे.

मुंबई: रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल. त्यानंतर बीचेसवर कुणीही फिरकु नये अशी सूचना महापालिका प्रशासनाने दिली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवसादिवशी वारंवार विनंती, आवाहने करुनही मुंबईकर आणि इतर पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यास जातात, तसेच बीचवर पोहण्यास जातात असं महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना कोणीही समुद्रकिनारी, बीचेसवर फिरण्यास किंवा पोहण्यास जायला प्रशासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. या संबंधित मुंबई महापालिका प्रशासनाने एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.
मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काल (बुधवारी) झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील काही भागांत पाणी साचल्यानं (Water Lodging) नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काल दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळं सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठताना दिसले. पण संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळं साचलेलं पाणी ओसरलं. पण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळ पुन्हा सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.
पुढील तीन दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात 15 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
