Shiv Sena Shakha : शिवसेनेत काम का करतो? मुस्लिम शिवसैनिकाला संपवणाऱ्या छोटा शकीलच्या घराजवळ शाखा
Shiv Sena Shakha in Nagpada: शिवसेनेत काम करणाऱ्या मुस्लिम शिवसैनिकाची हत्या करणाऱ्या गँगस्टर छोटा शकीलच्या घराजवळ आता शिवसेनेची शाखा आहे.
Shiv Sena Shakha in Nagpada: शिवसेनेत काम करतो म्हणून गँगस्टर छोटा शकीलने एका मुस्लिम शिवसेना शाखाप्रमुखाची हत्या केली होती. आता, त्याच छोटा शकीलच्या घराजवळ शिवसेना ठाकरे गटाची शाखा आहे. मुंबईत मुस्लीम बहुल वस्तीत शिवसेनेची ही शाखा असणे मुंबईतील राजकीय, सामाजिकदृष्ट्या चर्चेचा विषय ठरू लागला आहे. नागपाड्यातील शिवसेनेची शाखा लक्ष वेधून घेत आहे.
1992 मध्ये बाबरी मशिदी पाडल्यानंतर देशभरात दंगल उसळली होती. मुंबईतही जातीय दंगल उसळली होती. यातून सामाजिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्याशिवाय, मराठी माणसांचा कैवार घेतलेल्या शिवसेनेचा हिंदुत्ववादी रंग दंगलीनंतर आणखी गडद झाला होता. अशा स्थितीतही नागपाडा सारख्या मुस्लिमबहुल विभागात शिवसेनेची शाखा सुरू झाली होती. या शाखेचा शाखाप्रमुख हा सलीम बडगुजर हा मुस्लिम शिवसैनिक होता. शिवसेनेची ही शाखा छोटा शकील राहत असलेल्या टेमकर मार्गावर होती.
मुंबईतील दंगलीचे पडसाद विविध पातळीवर उमटले. गुन्हेगारी विश्वातही फूट पडली. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊद इब्राहिमपासून छोटा राजनने फारकत घेतली. तर, अरुण गवळी त्याआधीपासून 'हिंदू डॉन' चर्चेत होता.
छोटा शकीलकडून सलीम बडगुजरची हत्या
ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात दुबईला पळून जाण्यापूर्वी टेमकर स्ट्रीट हे अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचे घर आणि कार्यालय होते. या कार्यालयातून शकील आपली सूत्रे हलवित अशी माहिती 'एबीपी न्यूज'चे वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी दिली. 1998 मध्ये मुस्लिमबहुल नागपाडा येथे शिवसेनेची शाखा उघडण्याचे धाडस केल्याबद्दल छोट्या शकीलच्या शूटर्सने सलीम बडगुजर नावाच्या शाखाप्रमुखाची हत्या केली होती. मुस्लिमविरोधी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पक्षाचे काम करतो आणि मुस्लिम भागात त्याचे बस्तान मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणून छोटा शकीलने बडगुजारला 'शिक्षा' दिली होती.
सलीम बडगुजरसोबत झालेल्या चर्चांच्या आठवणींना उजाळा देताना जितेंद्र दीक्षित सांगतात, सलीम बडगुजर हा बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा चाहता होता. मुंबईत उसळलेल्या दंगलीसाठी दोन्ही धर्मातील लोक जबाबदार असल्याचे बडगुजर यांनी मत व्यक्त केले होते. बाळासाहेब हे देशप्रेमी आहेत आणि मीदेखील देशप्रेमी आहे. त्यामुळे शिवसेनेचे काम करण्यासाठी कोणतीही अडचण वाटत नसल्याचे बडगुजर यांनी सांगितले असल्याची आठवण जितेंद्र दीक्षित यांनी सांगितली.
त्यावेळी शिवसेनेची प्रतिमा मुस्लिम विरोधी असल्याने, दंगलीत मुस्लिमांचे नुकसान करणारी अशी झाली होती. न्या. श्रीकृष्ण आयोगानेदेखील मुंबईतील दंगल प्रकरणी शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ठपका ठेवला होता. शिवसेनेच्या मुस्लिम विरोधी प्रतिमेमुळे छोटा शकीलच्या शूटर्सनी सलीम बडगुजरची हत्या केली. पण आज पंचवीस वर्षांनंतर छोटा शकीलच्या पूर्वीच्या राहत्या घराशेजारीच एका मुस्लिमाने शिवसेनेचे कार्यालय उघडले आहे.
छोटा शकीलच्या घराजवळ शिवसेनेची शाखा
नागपाडा येथील शिवसेनेचे (UBT) कार्यालय हे पक्षाच्या मुंबईतील मुस्लिमांशी असलेल्या नातेसंबंधाचे उदाहरण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दशकापूर्वीपर्यंत शिवसेनेकडे मुस्लिमविरोधी पक्ष म्हणून पाहिले जात होते. पण आता, शिवसेनेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहिले जात आहे. ज्या टेमकर स्ट्रीटवर छोटा शकीलच्या दहशतीची छाया होती. आता, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेची शाखा दिसत आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांवरही चर्चा होऊ लागली आहे.
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चांगली प्रतिमा
2004 मध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यावर परिस्थिती बदलू लागली असल्याकडे अनेक राजकीय विश्लेषक लक्ष वेधतात. उद्धव हे संयमी, अनुकूल आणि सहिष्णू मानसिकतेचे व्यक्ती असल्याचे दिसून आले. शिवसेना आपल्या हिंदुत्वाच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही, असा दावा उद्धव नेहमी करत असले तरी त्यांच्या हिंदुत्वाच्या कल्पनेत मुस्लिमविरोधी घटक नाहीत. उद्धव यांनी मुस्लिम समुदायावर अपमानास्पद टीका केली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे, कोरोना काळातील कामांमुळे मुस्लिम मतदार त्यांच्याकडे वळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे टेमकर स्ट्रीटवरील शिवसेनेच्या शाखेबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे.