(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई पोलीस राणा दाम्पत्याला चौकशीसाठी नोटीस जारी करण्याची शक्यता : सूत्र
मुंबई पोलीस राणा दाम्पत्याला चौकशीसाठी नोटीस जारी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावरुन उद्भवलेल्या वादात जेलची हवा खाऊन बाहेर आलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढू शकतात. मुंबई पोलीस राणा दाम्पत्याला चौकशीसाठी नोटीस जारी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांनी बोलावल्यास राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागेल, असाही उल्लेख होता. पोलिसांना राणा दाम्पत्याला चौकशीसाठी बोलवायचं असल्यास 24 तास आधी नोटीस द्यावी लागणार आहे.
राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस कोर्टात
अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या अपक्ष खासदार पत्नी नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठणाचं आंदोलन पुकारलं होतं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आणि आयपीसी कलम 124 (अ) अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र याप्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयाने 4 मे राजी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला. मात्र यावेळी राणा दाम्पत्यावर न्यायालयाने अनेक अटीशर्ती लादल्या होत्या. त्यानुसार, त्यांना जामीनावर बाहेर आल्यावर त्यांना प्रसारमाध्यामांशी बोलण्यासही मज्जाव करण्यात आला होता. नेमका तोच मुद्दा पकडत मुंबई पोलिसांनी राणांविरोधात पुन्हा कोर्टात धाव घेतली आहे. जामिनातील कोणत्याही अटीचा भंग झाल्यास जामीन रद्द होईल, असं आदेशात स्पष्टपणं म्हटलेलं असल्यामुळे हा जामीन तात्काळ रद्द होतो, असा दावा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे.
राणा दाम्पत्या सोमवारी (9 मे) दिल्लीला गेले असून त्याआधीही त्यांनी प्रसारमाध्यमांकडे पुन्हा आपली भूमिका मांडली. शिवाय हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधत प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य केली असून जामीन मंजूर करताना ज्या अटी घातल्या होत्या त्याचं हे स्पष्टपणे उल्लंघन असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा पोलिसांकडून विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. याशिवाय मुख्यमंत्र्यांसह त्यांनी संजय राऊत, अनिल परब या शिवसेनेच्या अन्य नेत्यांनाही थेट आव्हान दिलं आहे, असा आरोपही प्रदीप घरत यांनी केला.
संबंधित बातम्या