(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navneet Rana: राणा दाम्पत्यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीकास्त्र, म्हणाले....
Navneet Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिल्लीत जाण्यापूर्वी महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Navneet Rana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत राणा दाम्पत्य आज दिल्लीकडे रवाना झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काहीच कामाचे नाहीत. त्यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. मुंबई पोलिसांनी आमचा पोलीस ठाण्यात छळ केला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सूडाच्या कारवाईची माहिती लोकसभा अध्यक्षांसह गृहमंत्र्यांना देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटले.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर आज अपेक्षेनुसार राणा दाम्पत्याने दिल्लीत धाव घेतली आहे. त्यापूर्वी राणा दाम्पत्याने आज माध्यमांशी संवाद साधला. नवनीत राणा यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींसोबत अशी वर्तवणूक होत असेल तर सामान्य लोकांचे काय होत असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून तुरुंगात झालेल्या छळाची माहिती त्यांना देणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये असेही नवनीत राणा यांनी म्हटले.
आमदार रवी राणा यांनीदेखील शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एका महिलेला सरकारने अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून आमच्या द्वेषातून कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांना चहा दिला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आम्हाला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी पहाटे पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणीदेखील देण्यात आले नव्हते असेही रवी राणा यांनी म्हटले. मुंबईत माझा एकच फ्लॅट आहे. फ्लॅट पाहण्यासाठी त्यांनी रिकामटेकडे असलेले अनिल परब आणि संजय राऊत यांना पाठवावे असा टोलाही राणा यांनी लगावला.
दरम्यान, आम्ही कोर्टाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले नसल्याचा दावा राणा दाम्पत्याने केला आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करत असून त्यांनी दिलेल्या चौकटीत वक्तव्य करत असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही हनुमान चालीसा, मातोश्री असा शब्ददेखील उच्चारला नसल्याचा दावा त्यांनी केला.