Mumbai Police : टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत; मुंबई पोलीस बनवणार विविध वस्तू, आयुक्त संजय पांडे यांची माहिती
Mumbai Police : टोपी, टी शर्टपासून परफ्यूमपर्यंत विविध वस्तू मुंबई पोलीस बनवणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Mumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून आजपासून मुंबईकरांच्या तणावमुक्तीसाठी संडेस्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून काही कपडे आणि वस्तू तयार करण्यात येणार आहेत. या वस्तूंची विक्री करून मिळणारे पैसे मुंबई पोलीस कल्याण निधीसाठी वापला जाईल, अशी माहिती आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे. संजय पांडे यांनी आज सोशल मीडियावरून मुंबईकरांसोबत संवाद साधला.
मुंबई पोलिसांकडून टी शर्ट, टोपी, कप, स्वेटर, ट्रकसूट, परफ्यूम, पाणी बॉटल यासारख्या विविध वस्तू बनवण्यात येणार आहेत. मुंबई पोलिसांकडून बनवण्यात येणाऱ्या या वस्तू शोरूममध्ये विकल्या जातील. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारे पैसे पोलिसांच्या कल्याण निधीसाठी वापरला जाईल, अशी माहिती संजय पांडे यांनी फेसबुकवरून संवाद साधताना दिली आहे.
दरम्यान, आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून आजपासून मुंबईकरांसाठी 'संडेस्ट्रीट' सुरू करण्यात आले आहे. मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या पुढाकाराने मुंबईत सहा ठिकाणी हे सँडेस्ट्रीट सुरू करण्यात आले आहेत.
मुंबईकरांना रस्त्यावर येवून मनोरंजन, योगा, स्केटिंग, सायकलींग तसेच सांस्कृतिक खेळ यासारखे कार्यक्रम करता यावेत यासाठी 'संडेस्ट्रीट' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 10 वेळेत रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन ते नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. आज संजय पांडे यांनी मरीन ड्राइव्ह या ठिकाणी या संडेस्ट्रीटमध्ये सहभाग घेतला आणि दौड केली.
मरीन ड्राइव्ह परिसरात मोठ्या प्रमाणत मुंबईच्या विविध भागातून नागरिक दाखल झाले होते. कोणी या मोकळ्या रस्त्यावर बॅडमिंटन खेळत होते, कोणी सायकलींग करीत होते, तर कोणी स्केटिंग आणि योगा करीत होते. या संकल्पनेचे मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. त्याचबरोबर मुंबईच्या विविध भागात ही संडेस्ट्रीट तयार करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- Sunday Street : मुंबईकरांसाठी पोलिसांकडून आजपासून 'संडेस्ट्रीट', तणावमुक्तीसाठी उपक्रम
- Yashwant Jadhav IT Raid : यशवंत जाधवांच्या 'मातोश्री' प्रकरणाची ईडी चौकशी करा, भाजपची मागणी
- आमदारांच्या घरांच्या मुद्द्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी काँग्रेस आमदाराला सुनावलं! म्हणाले, तुमच्याकडे मुंबईत कोट्यवधीची 10 घरं