Yashwant Jadhav IT Raid : यशवंत जाधवांच्या 'मातोश्री' प्रकरणाची ईडी चौकशी करा, भाजपची मागणी
Yashwant Jadhav IT Raid : यशवंत जाधव यांनी मातोश्रीला कोट्यवधी रुपये दिल्याच्या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही भाजपनं केली आहे.
Yashwant Jadhav IT Raid : शिवसेना नेते यशवंत जाधव सध्या आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर असून त्यांची चौकशी सुरु आहे. अशातच यशवंत जाधवांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अशातच यावरुन भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, यशवंत जाधव यांनी मातोश्रीला कोट्यवधी रुपये दिले याची ईडी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही भाजपनं (BJP) केली आहे. दरम्यान, डायरीतील 'मातोश्री' म्हणजे आई, असं स्पष्टीकरण यशवंत जाधव यांनी दिलं असल्याची माहितीही आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी एक व्हिडीओ जारी करत यशवंत जाधव यांनी मातोश्रीला कोट्यवधी रुपये दिल्याची ईडीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, "कोरोना काळात 38 प्रॉपर्ट्या खरेदी करुन 300 कोटी मिळवणाऱ्या यशवंत जाधवांच्या डायरीमध्ये कोट्यवधी रुपये मातोश्रीला, 50 लाखांचं घड्याळ मातोश्रीला यो नोंदी सापडत आहेत. या सगळ्या प्रकाराची चौकशी या सगळ्याची चौकशी ई़डी मार्फत झाली पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. मुंबईकर जनतेचे लुटलेले पैसे हे परत मुंबईकर जनतेला मिळाले पाहिजेत. तसेच, ही मातोश्री कोण? बंगला? बंगल्यातील माणसं की अन्य कोणी? या सगळ्याची सखोल चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा भाजप याविरोधात मोठं आंदोलन करेल."
आम्ही आधीच म्हणत होतो की, कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरुये : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, मुंबई मनपातील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाकडून यशवंत जाधवांच्या घरी छापा टाकण्यात आला असून त्यांची काही संपत्तीही आयकर विभागानं जप्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नेत्यांवरही केंद्रीय तपास यंत्रणांची नजर असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, यशवंत जाधवांर केलेली कारवाई ही भाजपनं सूडबुद्धीनं केली असल्याचं मत शिवसेना नेत्यांकडून वारंवार व्यक्त केलं जात आहे.
यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख
सध्या दररोज महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आयकर विभागाच्या आणि ईडीच्या धाडी सुरु आहेत. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांवर धाडी सुरु आहेत. अशातच, यशवंत जाधवांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. डायरीतील 'मातोश्री' म्हणजे आई, असं स्पष्टीकरण यशवंत जाधव यांनी दिलं असल्याची माहितीही आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
यशवंत जाधवांवर सोमय्यांनी केले होते आरोप
आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांवर आयकर विभागाकडून करण्यात आलेली कारवाई शिवसेनेसाठी धक्का समजली जात आहे. जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :