(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News: मुंबईकरांना दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो, 1100 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
ठाकरे गटाने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने 10 टक्के सुरू असलेली पाणी कपात रद्द करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा आणि विहार धरण भरलं. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातपैकी तीन धरणे भरली आहेत. तानसा धरणात 94.27 टक्के तर विहार धरणात 95.75 टक्के पाणीसाठा. सातही धरणांमध्ये 55 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाने पाणीसाठ्यात वाढ झाल्याने 10 टक्के सुरू असलेली पाणी कपात रद्द करावी अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सद्यस्थितीत 58.93 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तुळसीनंतर आता तानसा आणि विहार धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. काल तानसा धरणात 94.27 टक्के पाणीसाठा होता तर विहार धरणांमध्ये 95.75 टक्के पाणी साठा होता. मात्र धरणक्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हे धरण सुद्धा आता पूर्ण क्षमतेने पहाटेच्या वेळी भरल्याची माहिती देण्यात आली आहे. सद्यस्थितीत सातही धरणांमध्ये मिळून 58 टक्के पेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे
तानसा धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण बुधवारी पहाटे तुडुंब भरून वाहू लागलं आहे. त्यामुळं तानसा धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तानसा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि भिवंडी, तर पालघर जिल्ह्यातील वाडा आणि वसई तालुक्यातील गावांचा समावेश आहे. तानसा धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी नदीपात्रातून जाताना काळजी घ्यावी. तसंच महसूल आणि पोलीस प्रशासनानं दक्ष राहावं, अशी सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.
सात तलावांतून वर्षभराचा पाणीपुरवठा
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. वर्षभरासाठी तलावात 14 लाख 47हजार 363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत यंदा मान्सूनचं आगमन वीसेक दिवस उशिरानं झालं. पण उशिरानं दाखल झालेल्या पावसानं गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत संततधार कायम राखली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी, वैतरणा, भातसा, विहार, तानसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा या सातही धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला.
हे ही वाचा :