Mulund Video : मराठी असल्याने मुलुंडमध्ये महिलेला ऑफिससाठी जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल, दोघेही पोलिसांच्या ताब्यात
Mulund Video : मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्रांवर अखेर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये (Mulund) मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारणाऱ्या गुजराती पिता पुत्रावर अखेर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रवीण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर अशी या पिता पुत्राची नावं आहेत.
मुलुंड पश्चिममध्ये ऑफिससाठी घर पाहायला गेल्यानंतर आपल्याला मराठी असल्याचं सांगत घर नाकारल्याचा आरोप तृप्ती देवरुखकर यांनी केला होता. याबाबत सोशल मीडियावर त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता आणि तो प्रचंड व्हायरल झाला. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
दोन्हीही आरोपी ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेशी संपर्क केला. तेव्हा तृप्ती देवरुखकर यांनी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन प्रवीण ठक्कर आणि निलेश ठक्कर यांच्याविरोधात कलम 341, 323, 504 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना रात्री ताब्यात घेतले आहे. आरोपींवरील सर्व कलम दखलपात्र आहेत, त्यामुळे त्यांना टेबल जामीन मिळू शकतो.
संदीप देशपांडे यांची टीका
या सगळ्या प्रकारावर मनसे नेते संदीप नेते यांनीही टीका केली आहे. "केम छो वरळी" होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
"केम छो वरळी "होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज आणि हिम्मत आली आहे की महाराष्ट्रात मराठी माणसाला घर देणार नाही म्हटतात ह्यांचा माज उतरवल्या शिवाय राहणार नाही जय मनसे जय राज साहेब
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 28, 2023
तृप्ती देवरूखकर यांनी व्हिडीओमध्ये काय म्हटलंय?
"जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकारणासाठी वापर करणे बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं म्हटलं. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही, तर संताप आहे. आज मला अनुभव आला तो प्रातिनिधीक आहे. अशा किती मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरं नाकारली असतील?"
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
