Mulund Video : मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारलं, धक्काबुक्कीही केली, मनसेच्या इंग्यानंतर माफी मागितली; व्हायरल व्हिडीओवर होतोय संताप व्यक्त
Trupti Deorukhkar Video: मुलुंडमधील घडलेला प्रकार हा प्रातिनिधीक आहे, असे अनुभव कितीतरी मराठी माणसांना रोज येत असल्याचं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
मुंबई: मुलुंडमध्ये (Mulund West) मराठी माणसाला घरं देणार नाही असं म्हणणाऱ्या व्यक्तीला मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. संबंधित व्यक्तीला माफी मागायला लावली असून या पुढे असा प्रकार होणार नाही असंही वदवून घेतलं आहे. तृप्ती देवरूखकर (Trupti Deorukhkar) या महिलेले तिला आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला माफी मागायला लावली. मात्र तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओनंतर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईत राहत असूनही इथल्या मराठी लोकांना घरं दिली जात नाहीत, त्यांना जाणूनबुजून डावललं जातं. अशा अनेक घटना रोज घडताना दिसत आहेत. मुलुंडमध्ये असाच अनुभव आपल्याला आल्याचं सांगत तृप्ती देवरूखकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला. मुलुंड वेस्टमध्ये ऑफिससाठी घर पाहायला गेल्यानंतर आपल्याला मराठी असल्याचं सांगत घर नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपला हात पकडला आणि पतीला धक्काबुक्की केल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्याला आलेल्या अनुभवानंतर मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्या पक्षांनी ते बंद करावं, शिवाजी महाराजांचं नावही घ्यायचं बंद करावं असं म्हणत तृप्ती देवरूखकर यांनी संताप व्यक्त केला.
MNS Action On Video : मनसैनिकांनी धडा शिकवला, माफी मागायला लावली
तृप्ती देवरूखकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलुंडमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर व्यक्तीला जाब विचारला. त्या व्यक्तीचे वय पाहता त्याला समजवण्यात आलं आणि माफीही मागायला सांगितली. माझी चूक झाली, मी मराठी माणसाची माफी मागतो असं तो व्यक्ती बोलताना व्हिडीओमध्ये दिसतोय.
Trupti Sagar Deorukhkar Video : तृप्ती देवरूखकर यांनी व्हिडीओमध्ये काय म्हटलंय?
"जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकारणासाठी वापर करणे बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं म्हटलं. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही, तर संताप आहे. आज मला अनुभव आला तो प्रातिनिधीक आहे. अशा किती मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरं नाकारली असतील?"
एकीकडे मुंबईत मराठी पाट्या लावाव्यात असे निर्देश न्यायालयाने दिले असताना दुसरीकडे मराठी माणसांना मात्र परप्रांतियांकडून घरं नाकारली जात असल्याचं वास्तव दिसतंय.
ही बातमी वाचा: