Mumbai News : अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अग्रवाल यांच्या 14 वर्षीय मुलाचा इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू,आत्महत्या की घातपात तपास सुरु
Mumbai News : अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरातील एका उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वसंत ओएसिस या इमारतीमधून पडून त्याचा मृत्यू झाला. कृष्णा अग्रवाल असं मृत मुलाचं नाव आहे.
Mumbai News : मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील (Andheri) मरोळ भागामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरोळ परिसरातील एका उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वसंत ओएसिस या इमारतीमधून पडून त्याचा मृत्यू झाला. कृष्णा अग्रवाल असं मृत मुलाचं नाव आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अगरवाल यांचा हा मुलगा आहे. तो नुकताच आपल्या आईसोबत मुंबईत सुट्टीसाठी आला होता. मात्र परवा शुक्रवारी (30 जून) संध्याकाळी इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन मुलाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी महापालिकेच्या विलेपार्ले इथल्या कूपर रुग्णालयात पाठवला. मुलाने आत्महत्या केली असावी, असा अंदाज लावून एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनंतर तो मुलगा डिप्रेशनमध्ये असल्याचं समजलं. त्यातच मोबाईल फोनवर गेम खेळत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला असावा असं कळतं. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
मुलाचे वडील अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी अगरवाल कुटुंब मुंबईत
मुलाच्या वडिलांचे नाव अनुपम अग्रवाल आहे. ते अमेरिकेत वास्तव्याला असून तिथले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत डॉक्टर अग्रवाल पत्नी आणि मुलगा, मुलीला मुंबईला फिरायला घेऊन येतात. यंदाही ते सुट्टीसाठी मुंबईत आले होते. अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरातील वसंत ओएसिस या इमारतीत ते राहत होते. 30 जून रोजी संध्याकाळी इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून मुलाचा जागीच मृत्यू झाला.
आत्महत्या की घातपात तपास सुरु
दरम्यान मुलाने 22 मजली इमारतीवरुन उडी मारली की त्याला कोणी मुद्दाम ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी मुलाचा मोबाईल फोन तपासासाठी ताब्यात घेतला आहे. या मुलाकडे आयफोन होता. या मोबाईल फोनमध्ये भरपूर गेम असल्याचं तपासात समोर आलं. त्यामुळे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये हा मुलगा गेम खेळत असताना टास्क पूर्ण करण्यासाठी डिप्रेशनमध्ये गेला असावा आणि त्यातच इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
एमआयडीसी पोलीस कॉम्प्लेक्स आणि जवळपासच्या भागात बसवलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फूटेज तपासत आहेत. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा