![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई मनपाचे वरातीमागून घोडे, वर्ष सरताना दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 39 कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय
मुंबई : मुंबई महापालिकेनं दहावीचं वर्ष सरताना विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीचा निर्णय घेतलाय. यासाठी तब्बल 39 कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र प्रत्यक्षात टॅब मिळेपर्यंत परीक्षाही होऊन गेलेली असणार आहे
![मुंबई मनपाचे वरातीमागून घोडे, वर्ष सरताना दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 39 कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय Mumbai Municipal Corporation decides to purchase tabs worth Rs 39 crore for 10th standard students at the ending of the year मुंबई मनपाचे वरातीमागून घोडे, वर्ष सरताना दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 39 कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/04/6cd13d38ff29d38f23d49ff24dcda5dd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई महापालिकेचे पुन्हा एकदा वरातीमागून घोडे दिसून आले. कारण दहावीचं वर्ष सरताना विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यासाठी तब्बल 39 कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत. मात्र प्रत्यक्षात टॅब मिळेपर्यंत परीक्षाही होऊन गेलेली असणार आहे. मार्च महिन्यात दहावीची बोर्डाची परीक्षा होणार असून येत्या काही दिवसांत पूर्वपरीक्षाही सुरू होणार आहे. तसेच, दहावीचे वर्गही आता संपत आलेले आहेत. यात विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणे सोयीचे व्हावे म्हणून टॅब खरेदी करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने उशिरा घेतला आहे. आता कार्यादेश मिळाल्यानंतर तब्बल दोन ते अडीच महिन्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅब मिळणार आहे. मात्र तोपर्यंत दहावीची परीक्षाही संपलेली असेल.
मुंबई महापालिकेचा टॅब खरेदीसाठी तब्बल 39 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. यामध्ये प्रत्येक टॅबसाठी 20 हजार 532 रुपये खर्च येणार आहे. मुंबई महापालिकेने 2021-22 या शैक्षणिक वर्षात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी व्हावे तसेच शिक्षकांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा हा या मागचा उद्देश होता.
आता मुंबई महानगरपालिकेकडून टॅबखरेदी करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. या टॅबमध्ये मराठीसह उर्दू, हिंदी, इंग्रजी या चार भाषांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याला बालभारतीची मान्यताही असेल. प्रत्येक टॅबसाठी महापालिकेला करासह 20हजार 532 रुपयांचा खर्च येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी 19 हजार 401 टॅबची खरेदी केली जाणार आहे.
मात्र दहावीची परीक्षा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षा होणार असून आता पूर्वपरीक्षाही जवळ आली आहे. मनपाच्या कंत्राटातील अटीनुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांचे टॅब 60 दिवसांत आणि हिंदी, उर्दू माध्यमाचे टॅब 75 दिवसांत पुरवायचे आहेत. तोपर्यंत दहावीच्या परीक्षाही संपणार असून हे टॅब आता सुट्टी काळात धुळखात पडणार आहेत.
महापालिकेतर्फे टॅबच्या खरेदीसाठी ऑगस्ट महिन्यात निविदा मागवण्यात आल्या. वर्षभर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू होते अशावेळी विद्यार्थ्यांना टॅबची सर्वाधिक गरज होती. आता निविदा प्रक्रिया जाहीर करून तब्बल चार महिन्यांनंतर स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Doctors Strike : महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संपाचा मागे
- ...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत
- Omicron in India : महाराष्ट्राला ओमायक्रॉनचा वाढता विळखा, मुंबईत एका दिवसात 40 नवे रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)