(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai : मुंबईतील गोखले पूलाच्या कामाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण, दुसरी तुळई खाली सरकवण्यात यश
Mumbai : मुंबईची 'लाईफ लाईन' असलेल्या रेल्वे परिसरातील भागात हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.
Mumbai : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण यामुळे वाहतुकीतील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे. अंधेरी पूर्व - पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर एकूण 90 मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही रविवारी रात्री यशस्वीपणे पार पडली आहे, हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक असून भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. मुंबईची 'लाईफ लाईन' असलेल्या रेल्वे परिसरातील भागात हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. येत्या काही दिवसात ही तुळई टप्प्याटप्प्याने 8 मीटरपर्यंत खाली आणण्यात येईल. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक सांगण्यात येत आहे. त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
पुढील रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतरच कार्यवाही होणार
पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर तसेच पुढील रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर ही कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पश्चिम रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे. नियोजित उंचीवर तुळई खाली आणल्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पूल विभागाने पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. प्रमुख अभियंता उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून तुळई सरकविण्याची कार्यवाही पार पाडली.
पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण
अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग सर्वसामान्य जनतेसाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. आता या पूल उभारणीतील महत्वाचा टप्पा म्हणजे दुसरी तुळई स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी महाकाय अशी तुळई रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याचे कामकाज पूर्ण करण्यात आले होते. याचाच पुढील टप्पा म्हणून काल दिनांक रविवारी रात्री दहा वाजेपासून ते आज पहाटे 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही तुळई रेल्वे भागावर उर्वरित 65 मीटरपर्यंत म्हणजेच एकूण 90 मीटरपर्यंत सरकविण्याचे कामकाज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे.
अत्यंत आव्हानात्मक काम
रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कामाची जोखीम तसेच तांत्रिक बाबी तपासून, त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक आणि वीजपुरवठा या दोन्ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्यानंतर तुळई स्थापनेचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. पुलासाठी तुळई स्थापित करणे हे अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असे काम आहे. पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार तसेच पश्चिम रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.
भारतातील पहिलाच प्रकल्प
दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच दक्षिणेकडील लोखंडी तुळईची जुळवणी रेल्वे रूळाच्या पूर्व बाजूस जमिनीपासून 14 ते 15 मीटर उंचीवर पूर्ण करण्यात आली आहे. ही तुळई पूर्णपणे सरकविल्यानंतर रस्ता रेषेमध्ये तुळई आरसीसी आधार स्तंभावर उभारण्यासाठी 8 मीटर पातळीपर्यंत खाली आणण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. एखाद्या पुलाच्या कामात १४ ते १५ मीटर उंचीवरून तुळई विशिष्ट उंचीपर्यंत खाली आणणे, असा हा भारतातील पहिलाच प्रकल्प आहे. मुंबईची 'लाईफ लाईन' असलेल्या रेल्वे परिसरातील भागात हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही - मनपा आयुक्त
रस्ता रेषेमध्ये तुळई स्थापन झाल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तिरिक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाची दक्षिणेकडील मार्गिका सुरू करण्यासाठी गर्डर लॉंचिंग हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय ठेऊन गर्डर लॉंचिंगची उर्वरित कार्यवाही सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता सत्वर पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न राहिल.
इतर बातम्या :