Mhada : मुलुंड, चेंबूर, कुर्ला, विक्रोळीतील म्हाडाच्या घरांच्या किंमतीत मोठी घट, मुंबईतील अन्य घरांच्या किंमती किती लाखांनी घटल्या?
म्हाडाकडून 370 घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय, ताडदेव, विक्रोळी ते दादर कोणत्या ठिकाणच्या घरांच्या किंमती किती रुपयांनी घटल्या?
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे 2030 घरांसाठी (Mhada Lottery 2024) लॉटरी काढण्यात आलेली आहे. मुंबईतील गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. यापैकी म्हाडानं 370 घरांच्या किंमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी केल्या होत्या.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. यापैकी काही सदनिकांच्या किंमती अधिक असल्यानं दर कमी करण्यासंदर्भात मागणी केली जात होती. त्यानंतर म्हाडानं विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी 370 घरांच्या विक्री किंमतीत 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
कोणत्या उत्पन्न गटातील किंमती किती कमी झाल्या?
म्हाडानं विकासकांकडून मिळालेल्या 370 घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती २५ टक्के, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 20 टक्के, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 15 तर उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी केल्या होत्या.
कोणत्या भागातील घरांची किंमत किती कमी झाली?
ताडदेवमधील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत 7.5 कोटी रुपये होती. ती 6 कोटी 75 लाख रुपये करण्यात आली आहे. दादर येथील अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 1 कोटी 62 लाखांवरुन 1 कोटी 30 लाख रुपये करण्यात आली. अंधेरी येथील अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 1 कोटी 50 लाखांवरुन 1 कोटी 18 लाख रुपये करण्यात आली आहे.
मुलुंड येथील मध्यम उत्पन गटातील घराची किंमत 1 कोटींवरुन 88 लाख रुपये झा आहे. बोरीवली येथील अल्प उत्पन्न गटातील 1 कोटींच्या घराची किंमत 82 लाख, सांताक्रुझ येथील अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 1 कोटीवरुन 82 लाख रुपये झाली आहे. चेंबूरच्या अल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 1 कोटींवरुन 83 लाख रुपये करण्यात आली आहे.
माझगाव येथील अल्प उत्पन्न गटातील 62 लाख रुपयांचं घर 50 लाखांना मिळेल. सांताक्रुझ येथील उत्पन्न गटातील 72 लाखांचं घर 57 लाख रुपयांना, विक्रोळीतील 86 लाखांचं घर 70 लाख, कुर्ला येथील 888 लाखांचं घर 71 लाख, तर कुर्ला येथील 37 लाख रुपयांचं घर 29 लाख रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, म्हाडानं घरांच्या नोंदणीसाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सोडतीची तारीख जाहीर केली जाईल.
इतर बातम्या :
मुंबईच्या म्हाडाच्या सोडतीबाबत मोठी अपडेट, फॉर्म भरणाऱ्यांना घर मिळालं की नाही हे कधी समजणार?