(Source: Poll of Polls)
सकाळपासून पावसाचा पत्ता नाही, तरीही मध्य रेल्वेच्या ट्रेन उशीरा; डोंबिवली, बदलापूर स्थानकात प्रचंड गर्दी, प्रवासी संतापले
Mumbai Local Train Updates: आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र तरीदेखील मध्य रेल्वेच्या ट्रेन उशीराने धावत आहे.
Mumbai Local Train Updates: मुंबई: मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली रायगड, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर (Heavy Rain In Mumbai) ओसरल्याचे दिसून येत आहे. मुंबईतसह उपनगरात काल (8 जून)रोजी पावसामुळे दाणादाण उडाली होती. यामुळे रेल्वे सेवा आणि रस्ते वाहतुक देखील विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र तरीदेखील मध्य रेल्वेच्या ट्रेन (Central Railway) उशीराने धावत आहे.
मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काल विस्कळीत असलेली मध्य रेल्वेची वाहतूक सुरू झाली . मात्र आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे आज देखील हाल झाले. कल्याण, बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नऊ वाजता सुमारास रेल्वे थोडीफार पूर्व पदावर आली असली तरी पाच ते दहा मिनिटांनी उशिराने धावत होती. लांब पल्ल्याच्या गाड्या तासभर उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे कल्याण रेल्वे स्थानकात लांबच्या प्रवासासाठी निघालेले प्रवासी ताटकळत आहेत. तर पश्चिम रेल्वे सुरळीत सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी-
हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली. आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे. अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा. भारतीय हवामान खात्याने मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.