मुंबईकरांनो दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडताय? पण, रविवारी तिनही मार्गांवर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, उद्या (रविवारी) दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणार असाल, तर त्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.

Mumbai Local Megablock : जर तुम्ही रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून दिवाळी (Diwali 2022) खरेदीसाठी घराबाहेर पडणार असाल, तर त्यापूर्वी बातमी वाचा. उद्या (रविवार, 16 ऑक्टोबर) तुमचं दिवाळी खरेदीचं नियोजन बारगळू शकतं. कारण उद्या लोकलच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मुंबईत (Mumbai) उद्या लोकलच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock News) घेण्यात येणार आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे. म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक पाहुनच बाहेर पडा.
मध्ये रेल्वेवर माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या वतीनं प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा-ठाणे अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या 15 मिनिटं उशिरानं नियोजित स्थळी पोहोचतील.
कल्याणहून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबून पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित स्थळी वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स ते माहिम स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते सायंकाळी 15.35 या कालावधीत मरीन लाईन्स ते माहिम स्थानकांदरम्यान जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीमध्ये सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गांवरील सेवा मरीन लाईन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या वळवलेल्या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबणार नाहीत.
हार्बर लाईनवर पनवेल -वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.
पनवेलहून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
























