बाप रे... मुंबईच्या 'लोकल'मध्ये आढळली बेवारस बॅग; बॅगमध्ये 20 लाख कॅश, प्रवाशाचा शोध सुरू
मुंबईतील सीएसएमटी स्थानकाहून कसाराकडे निघालेली लोकल कल्याण रेल्वे स्थानकात रात्री 11 वाजता पोहोचली. त्यावेळी, प्रवाशांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी बेवारस बॅग ताब्यात घेतली
मुंबई : स्वप्ननगरी मुंबईच्या लोकल (Local) ट्रेनमध्ये कायम गर्दी अन् वर्दळ असते, तब्बल 75 लाख प्रवासी मुंबई लोकलने दररोज प्रवास करतात. त्यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस, लोहमार्ग पोलीस, रेल्वे पोलिसांसह सुरक्षा यंत्रणा प्रवाशांच्या सेवेत कार्यरत असतात. तसेच, रेल्वे प्रवाशांकडूनही प्रवाशांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. त्यामध्ये, बेवारस वस्तूंना हात लावू नका, बेवारस वस्तूंपासून सावध राहा, असे सांगण्यात येते. मात्र, आता मुंबईतून (Mumbai) कसारा स्थानकादरम्यान धावणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये एक बेवारस बॅग सापडली असून त्यामध्ये तब्बल 20 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. लोकलमधील काही प्रवाशांनी ही बॅग पोलिसांकडे (Police) सोपवल्यानतंर बॅगेत रोकड असल्याचे दिसून आले.
मुंबईतील सीएसएमटी स्थानकाहून कसाराकडे निघालेली लोकल कल्याण रेल्वे स्थानकात रात्री 11 वाजता पोहोचली. त्यावेळी, प्रवाशांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी बेवारस बॅग ताब्यात घेतली असता, ती बॅग पैशांनी भरेलली होती. या बॅगेत सापडली 20 लाखांची रोकड सापडली असून 500 रुपयांच्या नोटांचे 7 बंडल्स आहेत. तसेच, ही Reebok कंपनीची बॅग असून औषधांचा बॉक्सही बॅगेत आढळून आला आहे. प्रवाशांना ही बेवारस बॅग आसनगाव रेल्वे स्थानकात सापडली होती, त्यांनी ती पोलिसांच्या ताब्यात दिली. कल्याण जीआरपी पोलिसांनी पंचनाम्याद्वारे बॅग जप्त केली असून मूळ मालकाचा शोध सुरू आहे. प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये बेवारस असलेल्या या बॅगमध्ये 20 लाख रुपये आढळून आले आहेत. ही बॅग कोणाची आहे, याचा तपास सध्या आमच्या यंत्रणांकडून करण्यात येत आहे, असे लोहमार्ग पोलिसांनी म्हटलंय.