अखेर भरत गोगावले 'मंत्री' झाले; MSRTC चा पदभार स्वीकारताच बस स्टँड सुधारण्याच्या सूचना
रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि शिवसेनेती वरिष्ठ नेते असल्याने भरत गोगावलेंची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सातत्याने होत होती
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला शिवसेनेच्या 9 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामध्ये, आमदार भरत गोगवले (Bharag gogavale) यांचे मंत्रीपद थोडक्यात हुकले. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एँट्री झाल्याने शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांना वेटिंगवरच राहावे लागले. त्यानंतर, तिसरा मंत्रिमंडळ विस्तार झालाच नाही, त्यामुळे मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळ देऊन त्यांचे समाधान करण्यात आले आहे. महामंडळासह (MSRTC) राज्य मंत्रीपदाचा दर्जा देऊन शिवसेना आमदारांना खुश करण्यात आलंय. त्यामध्ये, भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले असून त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला.
रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि शिवसेनेती वरिष्ठ नेते असल्याने भरत गोगावलेंची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सातत्याने होत होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार रखडला तो निवडणुकांपर्यंत. त्यामुळे, भरत गोगावले यांच्याही गळ्यात आता महामंडळ अध्यक्षपदाची माळ पडली आहे. महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारावे की नाही, यावरही त्यांच्याकडून चालढकलपणा सुरू होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत चर्चा केल्यानंतर अखेर आज आमदार भरत गोगावले यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी, महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी स्वागत व अभिनंदन केले.
बस स्टँड सुधारणा करा
भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळ जाहीर झाल्यानंतर ते नाराज होते. त्यामुळे, या महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर गोगावले यांनी परिवहन महामंडळाचा पदभार अखेर स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यातील एसटी स्टॅड सुधारण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच, बस स्टँड आधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असेही ते म्हणाले. तर, लवकरच एसटीच्या ताफ्यात 2200 नव्या बसेस येत असल्याची माहितही नवनिर्वाचित अध्यक्षांनी दिली. दरम्यान, एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पाहून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासनही त्यांनी कामगार संघटनांना दिलं आहे.
रायगडच्या एका जागेवरील वाद सोडवू
मुख्यमंत्र्यांकडून महायुतीमध्ये उरलेल्या मंत्रिपदांचा विस्तार करताना, मंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता. पण, महायुतीत तिसरा मित्र आला आणि ते राहून गेले. कारण, आपण तिसऱ्या मित्राला पाहिलंतं, तर महत्वाची खाती त्यांना देण्यात आली आहेत. त्यामुळे आम्ही हातात हात घालून चालत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपात 2 ते 5 जागा इकडे -तिकडे होतील, पण पुन्हा सत्ता यायची असेल तर एकत्र रहायला हवे. रायगडच्या एका जागेवरून जो वाद सुरूआहे, ते आम्ही वरिष्ठ पातळीवर सोडवू आणि रायगड जिल्ह्यातील सातच्या सात जागा निवडून आणू, असा विश्वासही गोगावले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
... तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल; कोल्हापुरातून पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य