लगीनसराईवर पालिकेचा वॉच! लग्न सोहळे, डिसेंबरमधील पार्ट्यांवर मुंबई महापालिकेची नजर, कोरोना नियम मोडल्यास कारवाई
Coronavirus Update : लग्न सोहळे आणि डिसेंबरमधील पार्ट्यांवर मुंबई महापालिकेची नजर असणार आहे. गर्दी करुन कोरोना नियम मोडल्यास मुंबई महानगरपालिका कारवाई करणार आहे.
Coronavirus Update : सध्या लगीनसराईचा महिना सुरु झाला आहे. कोरोना (Coronavirus) निर्बंध शिथिल झाल्यानंतर या लग्न सोहळ्यांत गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी झाल्यास कोरोना (Corona) वाढवण्याचा धोका आहे. हिच गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) तयारी केली आहे. लग्नसोहळे आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवर मुंबई पालिका नजर ठेवणार आहे.
लग्न समारंभ (Wedding) तसेच डिसेंबरमध्ये हॉटेल-रेस्टॉरंट, बारमध्ये होणाऱ्या इअर एंड पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागांत पालिकेची दोन भरारी पथके तैनात केली जाणार आहेत. कोरोना नियमावलीचा कुठेही भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास जागच्या जागी कारवाई होणार आहे. कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. सध्या लग्न सोहळ्यासाठी दोनशे जणांची उपस्थिती किंवा हॉलच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजित करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे तिसरी लाट टळली असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. परंतु, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी काळजी घेणं अत्यंत आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली असून अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे.
पाहा व्हिडीओ : लगीनसराई आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या पार्ट्यांवर पालिकेची नजर, गर्दी झाल्यास BMC कारवाई करणार
सध्या लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉलच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्याचं बंधन घालण्यात आलं आहे. पण, कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांहून जास्त काळ 'नियमांच्या कचाट्यात' असलेल्या नागरिकांडून नियम मोडले जाण्याची शक्यता आहे. हा बेजबाबदारपणा रुग्णसंख्या वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. मुंबई महानगरपालिकेनं डिसेंबरमधील लग्नसराई आणि इयर एन्डिंगसाठी विशेष योजना आखली आहे. यासाठी अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या घरातही लग्न कार्य असेल किंवा कुठे बाहेर जाण्याचा प्लान करत असाल, तर मुंबई महानगर पालिकेची तुमच्यावर नजर असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Local Trains : लोकल प्रवाशांसाठी खुशखबर; लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तिकीट मिळवणं आणखी सोपं
- टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी, मुंबई महापालिकेची भूमिका
- Mumbai Vaccination : तीन लाख मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई पालिका सज्ज; राज्य सरकारच्या सूचनेनंतर लसीकरण सुरु करणार