टास्क फोर्स आणि राज्य शासनानं बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी, मुंबई महापालिकेची भूमिका
मुंबईत कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून 70 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आता बूस्टर डोस देण्याचे नियोजनही करण्यात येत आहे.
मुंबई : मुंबईतील सर्व नागरिकांचा कोरोनाचा पहिला डोस पूर्ण झाला असून 70 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता लसीकरणाच्या कार्यक्रमाची गती आणखी वाढवण्यात येत असून दोन्ही डोस झालेल्यांना बूस्टर डोस देण्याचेही नियोजन सुरु झालं आहे. त्यामुळे कोविड टास्क फोर्स आणि राज्य शासनाने बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी मुंबई महापालिकेने केली आहे.
कोविड टास्क फोर्स आणि राज्य शासनाकडून बुस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारसी केल्या जातील. त्यानंतर केंद्राकडून त्या बाबत सूचना येतील. या सूचना आल्यानंतर कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहेत. मुंबईतील लसीकरणाची गती कायम ठेवण्यासाठी 400 च्या वर लसीकरण केंद्र सुरु ठेवण्यात येतील अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील 70 टक्के लोकांचा दुसरा डोस पूर्ण
मुंबईत कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून 70 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे. मुंबई शहराची इतकी मोठी लोकसंख्या असताना, अतिशय कमी वेळेत मुंबई महापालिका प्रशासन आणि मुंबईकरांनी एकत्रितपणे ही कामगिरी केलीय. त्यामुळे टास्क फोर्सच्या नियमांनुसार मुंबई सेफ झोनमध्ये पोहोचली आहे. यानंतर राज्य सरकार आणखी काही निर्बंध शिथिल करण्याची शक्यता देखील आहे. मुंबई सोडली तर इतर शहरांमध्ये मात्र अजूनही लसीकरणाचा हवा तसा वेग बघायला मिळत नाही.
लहान मुलांच्या डोसबाबत अद्याप सूचना नाहीत
मुंबई महापालिकेनेही तीन लाख मुलांच्या लसीकरणाची तयारी केली असून राज्य सरकार आणि कोविड टास्क फोर्सची सूचना येताच या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या सूचना अद्याप आल्या नाहीत. टास्क फोर्सकडून सूचना येताच दोन ते तीन दिवसात प्रशिक्षित स्टाफ कडून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
ख्रिसमस सुट्ट्यांमध्ये परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यामुळे आरटीपीसीआर आणि इतर काळजी घेऊनच त्यांना विमानतळावर प्रवेश देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.
पाचवा सेरो सर्व्हे जानेवारी 2022 मध्ये केला जाईल. हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला जाईल. त्यांच्यातील अँटिबॉडिज चेक केल्या जातील, कारण त्यांना पहिला डोस देऊन एक वर्षे होईल.
संबंधित बातम्या :
- Mumbai Vaccine : मुंबईत 100 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस, आता पूर्ण लसीकरणाचं ध्येय
- Mumbai Vaccination : तीन लाख मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई पालिका सज्ज; राज्य सरकारच्या सूचनेनंतर लसीकरण सुरु करणार
- School Reopen : शाळा सुरु करण्याबाबत महापालिका अनुकूल तर मुलांच्या लसीकरणानंतर शाळा सुरु कराव्यात टास्क फोर्सचा आग्रह