VIDEO Elephanta Boat Accident : एलिफंटाकडे जाणारी बोट बुडाली, इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटने समोरुन धडक दिल्याने दुर्घटना, तीन प्रवाशांचा मृत्यू
Neelkamal Boat Accident : मुंबई बोट अपघातामध्ये 77 जणांना वाचवण्यात आलं आहे तर तिघांचा मृत्यू झाला. इंडियन नेव्हीच्या बोटीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची (Mumbai Neelkamal Boat Accident) घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने जोरदार धडक दिल्याने प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट बुडाल्याची माहिती आहे.
स्पीड बोटेने राऊंड मारला आणि समोरून धडक दिली
या अपघाताची दृश्य ही कॅमेरात कैद झाली आहेत. त्यामध्ये एक स्पीड बोट ही आधी मोठा राऊंड मारताना दिसत आहे. नतंर ही स्पीड बोट नीलकमल या बोटीला समोरून धडक मारते. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. धडक मारणारी ही स्पीड बोट इंडियन नेव्हीची असल्याचं सांगितलं जातंय. ही बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंडियन नेव्हीकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे.
बचावकार्य पूर्ण
घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झालं असून 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापासून घटनास्थळ जे समुद्रात जवळपास 10 किमी अंतरावर आहे.
स्पीड बोटीवरचा ताबा सुटला
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना वाचवलं आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येतील. तर मृतांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून मदत दिली जाईल."