Mumbai News :महानगरपालिकेच्या अख्यारितील शौचालयांची अवस्था दयनीय, मायानगरीतलं धक्कादायक वास्तव समोर
Mumbai News : मुंबईतील अनेक शौचालयांची अवस्था ही अत्यंत दयनीय असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) ही जगातल्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. तसेच मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. पण याच स्मार्ट सिटी म्हणून घेणाऱ्या शहराच्या सर्व अनेक शौचालयांमध्ये तुम्ही जाऊ शकता का? याचे उत्तर येणार ते म्हणजे "नाही". मुंबई महानगरपालिकेने ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी याच वर्षी नवे टेंडर मागवले. पण याच महानगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय अत्यंत घाणेरड्या अवस्थेत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. याच गोष्टीविषयी एबीपी माझाने रियालिटी चेक केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था पाहिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आयुक्तांनी एक बैठक घेऊन सार्वजनिक शौचालयांमध्ये स्वच्छता राखण्याचे आदेश दिले होते. मात्र अजूनही त्या आदेशाचे पालन झालेले नसल्याचं दिसून येतय.
मुंबईतील शौचालयांची दयनीय अवस्था
मुंबईचे हृदय असणाऱ्या दादर फुल मार्केटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुंबई काही संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र त्यांच्यासाठी जे एकमेव शौचालय महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलं आहे त्याची देखील अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं समोर आलं आहे. हिवरा परिसर हा मुंबईतल्या पोलीस वसाहतीच्या बाजूचा आणि मोठ्या तीन हॉस्पिटलच्या बाजूचा परिसर आहे. या परिसरामध्ये देखील अस्वच्छ दुर्गंधीयुक्त शौचालय असल्याचं आढळून आलं आहे.
मुंबई महानगरपालिका शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि स्वच्छतेसाठी देखील करोडोंचा निधी खर्च करते. मात्र त्यातून मुंबईकरांना कशा प्रकारची सुविधा मिळते हेच या रियालिटी चेक मधून दिसून आलं. हे तर मुंबईच्या मुख्य शहरात आणि प्रमुख भागांमध्ये शौचालय होते.पण मुंबईच्या अंतर्गत धाटीवाटीच्या झोपडपट्टी विभागात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची सत्य परिस्थिती विचार देखील करता येणार नाही इतकी भयावह आहे.
महिलांसाठी मोठं दिव्य
मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची अवस्था आपण पाहिलीच पण यात सर्वाधिक कुचंबना होते ती महिलांची. कारण मुंबईमध्ये फक्त महिलांसाठी असे असलेले शौचालय अतिशय कमी आहेत. सार्वजनिक शौचालयांच्या बाजूलाच महिलांसाठी एक किंवा दोन शौचालय बांधलेले असतात. मात्र त्या शौचालयांमध्ये असलेली अस्वच्छता पाहून अनेक महिला तिथं जाणं टाळतात. एकतर अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त शौचालय त्यात महिलांकडून अधिकचे पैसे देखील आकारले जातात. त्यामुळे अनेक महिला मुंबईमध्ये प्रवास करत असताना कित्येक तास पाणी न पिता प्रवास करतात.
मुंबईतील शौचालयांचा आकडा
मुंबईत एकूण 8173 सार्वजनिक शौचालये आहेत. त्यामधील 3254 शौचालये ही मुंबई महानगरपालिकेच्या अख्यारित येतात, तर 3651 शौचालये म्हाडाच्या अखत्यारीतील आहेत. यामध्ये 772 ही पे अँड युज शौचालय आहेत. तसेच 500 शौचालये ही इतर विभागामध्ये येतात.
मुंबई शहर हे जागतिक दर्जाचे शहर बनवले जात आहे. पण या शहरात असलेल्या नागरिकांसाठी तसेच प्रवाशांसाठी रस्त्यावर किंवा प्रवासामध्ये शौचालयासारखी साधी गरज महापालिकेला पूर्ण करता येत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर या संदर्भात प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी खरंच विचार करण्याची आवश्यकता आहे. निदान भविष्यात तरी मुंबईतल्या शौचालयांची परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येतेय.
हेही वाचा :
Mumbai News : 'खाकी'तल्या दुर्गांसाठी 'वोलू'अॅपची सोय, काय आहे हे अॅप?