मुंबई : "काही महिन्यात हातांची नियमित हालचाल होण्यास सुरुवात होईल, तेव्हा प्रथम त्या हाताने मी माझ्या बाबांच्या फोटोला नमस्कार करेन. माझं पूर्ण नाव लिहून काढेन." हे शब्द आहेत काही महिन्यापूर्वी दोन्ही हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या मोनिका मोरेचे. मोनिका महाराष्ट्रातील अशी शस्त्रकिया झालेली पहिली मुलगी असून अवघ्या 7 महिन्यात ती शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आनंद व्यक्त करत आहे. रेल्वे अपघातानंतर दोन्ही हात गमविलेल्या मोनिकाचा या शस्त्रक्रियेनंतर आत्मविश्वास वाढला आहे. ती आता पूर्वीसारख्या सगळ्या गोष्टीचा निर्धार करत लवकरच तिला तिच्या घरातील सदस्यांसाठी नोकरी करायची आहे, अशी इच्छा व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे ती असंही म्हणते, पुढच्या सहा महिन्यात माझ्या हाताच्या हालचालीत नक्कीच मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झालेले असतील. सध्या मी छोट्या गोष्टी उचलण्यात यशस्वी होत आहे, मात्र अजून बराच सराव बाकी आहे आणि तो मी डॉक्टरांच्या सहकार्याने पूर्ण करेन असा विश्वासही तिने एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केला.
कुर्ला येथे राहणाऱ्या मोनिकाच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. मोनिकाला हात मिळावेत ही त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठी ते खूप मेहनतही घेत होते. त्यामुळे सध्या आई, तिचा लहान भाऊ आणि ती असे तीनच सदस्य त्यांच्या कुटुंबात आहेत. मोनिकाच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालय व्यवस्थापन आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मदत केली आहे. अपघात झाल्यानंतरही जिद्दीने आपलं पदवी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं. एका लहान रुग्णालयात हात नसतानाही सुपरवायझरची ती काम करत होती. मात्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती आता पूर्णवेळ आता हाताची काळजी घेत आहे. कारण ही शस्त्रक्रिया फार अवघड आणि त्या शस्त्रक्रियेला प्रतिसाद मिळण्याकरिता वेळ खूप लागतो. तरी सात महिन्यात तिने चांगल्या प्रकारे शस्त्रक्रियेला प्रतिसाद दिला असल्याचे तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर सांगतात. मोनिकाच्या दोन्ही हातांना आजही सपोर्ट लावलेला असतो. तिचा लहान भाऊ कार्तिक तिला दिवसाआड फिजिओथेरपीसाठी रुग्णालयात घेऊन येत असतो.
"पूर्वीच्या प्रोस्थेसिस पेक्षा मी माझ्या सध्या या हातांवर प्रचंड खुश आहे. मी आता छोट्या-छोट्या वस्तू या दोन हातांनी उचलायचा प्रयत्न करत आहे. मी अंगठ्याचा वापर करून मोबाईलवर मेसेज टाईप करू शकते. याकरिता रुग्णलयातील माझे डॉक्टर निलेश सातभाई आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. प्राजक्ता करंबे खूप मेहनत घेत आहे. मला नक्की विश्वास आहे, पुढच्या सहा महिन्यात माझी हाताची हालचाल बऱ्यापैकी झालेली असेल. मी जेव्हा केव्हा चांगली हालचाल करेन तेव्हा मी प्रथम माझ्या बाबांच्या फोटोला नमस्कार करेन. माझं पूर्ण नाव लिहीन. मी व्यवस्थित झाल्यावर मला माझ्या कुटुंबीयांकरिता नोकरी करायची आहे. सध्या हाच माझ्या आयुष्यातील प्राधान्यक्रम आहे." असे मोनिका सांगते.
ती पुढे असेही म्हणते की, "आज मला ज्यांनी हे हात दान केले, त्या दानशूर दात्याचे आणि त्या कुटुंबियांचे मी आभारी आहे. त्यांनी हात दान करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मला हे हात मिळाले आहेत. मात्र समाजात हात दान करण्याविषयी अजून खूप मोठ्या पद्धतीने जनजागृती होण्याची खूप गरज आहे. येत्या काळात मी हाताचे दान ह्या विषयांवर जनजागृतीचे काम करणार आहे. कारण माझ्यासारखे अजून बरे लोक हातासाठी प्रतीक्षा यादीवर आहेत."
2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया ऑगस्ट 28, 2020 रोजी करण्यात आली. याकरिता 32 वर्षीय एका मेंदूमृत व्यक्तीकडून तिला हे हात मिळाले असून ते चेन्नई वरून येथे आणण्यात आले होते. दोन वर्षांपासून मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला हात मिळावेत म्हणून नाव प्रतीक्षा यादीत टाकून ठेवले होते. तोपर्यंत तिला 'प्रोस्थेसिस लावण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया परळ येथील ग्लोबल रुग्णलयात पार पडली असून त्याकरिता 15 तासांचा अवधी लागला असून 35-40 डॉक्टरांचा यामध्ये सहभाग होता. डॉ. निलेश सातभाई यांनी ह्या संपूर्ण शस्त्रक्रियांचे नेतृत्व केले असून मायक्रोव्हयस्कुलर, ऑर्थोपेडिकस, प्लास्टिक सर्जन आणि अॅनेस्थेसिस्ट या विविध विषयातील तज्ञांचा या टीममध्ये समावेश होता. तिच्या दोन्ही हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
याप्रकरणी, या हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे ग्लोबल रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन, डॉ. निलेश सातभाई सांगतात की, "हाताचे प्रत्यारोपण ही खूपच अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. मोनिकाची शस्त्रक्रिया होऊन जवळपास 7-8 महिने झाले. माझ्यासाठी ही केस आव्हानात्मक होती, पण मला माझ्या शस्त्रक्रियेवर पूर्ण विश्वास होता. ज्यापद्धतीने मला या शास्त्रक्रियेनंतरचा प्रतिसाद अपेक्षित होता त्याप्रमाणे मिळत आहे. यामध्ये मी समाधानी आहे. अर्थात अजून मोठा पल्ला पार पडायचा आहे. पण मोनिका ज्यापद्धतीने छोट्या गोष्टी फिजोथेरपी करताना उचलत आहे, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. 40-50 टक्क्यांपर्यंत तिची रिकव्हरी आहे. हातात अजून जास्त प्रमाणात बळ यायला साहजिकच आणखी काही महिने लागणार आहे. पण मोनिकाची जिद्द पाहता ती लवकरच तिच्या दोन्ही हाताने तिचे काम करता येईल एवढी हालचाल करू शकेल. मोनिका गेले काही दिवस सध्या नियमितपणे ग्लोबल रुग्णालयात आठवड्याला तीन वेळा फिजिओथेरपीसाठी येत आहे. तिची परिस्थिती बेताची असली तरी उपचारात मात्र कुठलीही कसर सोडलेली नाही. प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना शक्यतो मोठा कालावधी इम्युनोसप्रेसंटची औषध चालू असतात ती तिलाही चालू असणार आहेत. मात्र ती सगळ्या गोष्टी व्यवस्थिपणे करते."
ते पुढे असेही सांगतात की, "मी गेल्या 11 वर्षात बऱ्याच प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. मात्र स्वतंत्रपणे दोन्ही हाताचे प्रत्यारोपण हे पहिल्यांदाच केले आहे. यापूर्वी अशा शस्त्रक्रिया ज्या ठिकाणी केरळ मधील रुग्णालयात झाल्या आहेत, तेथे जाऊन त्या तज्ञांशी बोललो आहे. वैद्यकीय परिषदेत या विषयांवरील चर्चेत सहभागी झालो आहे. या शस्त्रक्रिया म्हणजे एकाकुणाचे काम नसते यासाठी पूर्ण टीम काम करत असते. मायक्रोव्हयस्कुलर सर्जन, ऑर्थोपेडिकस, प्लास्टिक सर्जन, अॅनेस्थेसिस्ट, सायकॅट्रिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, नर्सिंग स्टाफ आणि हॉस्पिटलचे आरोग्य व्यवस्थापन या सगळ्याचा सहभाग आहे. आजही माझ्याकडे तीन रुग्ण प्रतिक्षायादीवर आहेत. मात्र आपल्याकडे हाताचे दाता मिळत नाही. लोकं आजही शरीराच्या आतील अवयव देतात, मात्र हात देत नाहीत. हाताचे प्रत्यारोपणही करता येऊ शकते हे फारच कमी लोकांना माहिती आहे. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना वाटतं की, हात दान केलं तर मृत रुग्णाचं शरीर कसं दिसेल. मात्र हात काढल्यानंतर त्याजागी कृत्रिम हात बसवले जातात हे लोकांना ठाऊक नाही. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. जेणेकरून मेंदूमृत अवयव दानामध्ये रुग्णाचे हातही दान केले जातील.
मोनिकाची फिजिओथेरपिस्ट डॉ. प्राजक्ता करंबे सांगतात की, "मोनिका ज्यावेळी रुग्णालयात फिजिओथेरपीसाठी येते त्यावेळीआम्ही तिच्याकडून लहान लहान गोष्टी उचलण्याचा सराव करून घेत असतो. त्यामध्ये ती व्यवस्थित सहकार्य करून मोठ्या जिद्दीने ती सराव करत असते. आमच्यासाठी ही केस तशी म्हणायला नवीनच आहे. काही दिवसांपासून तिच्यामध्ये चांगले बदल जाणवू लागले आहेत. पण मात्र अजून बरेच काम बाकी आहे."
आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केले जाते. कालांतराने या कायद्यात अधिक बदल करून 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. 2019 साली सुमारे 160 मेंदूमृत अवयवदान पार पडले होते, त्यामुळे 445 पेक्षा अधिक रुग्णांना नवीन जीवन मिळाले होते. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. राज्याचे देशपातळीवर कौतुक करण्यात आले होते. यावर्षी म्हणजे 2020 मध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता जास्त असतानाच नेमका यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अख्या देशात झाला आणि या सामाजिक मोहिमेला एक प्रकारची खीळ बसली. मेंदूमृत अवयवदानामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळण्यास मदत होत असते. मार्च ते जुलै या महिन्यात केवळ 22 अवयदान राज्यात पार पडले होते, गेल्यावर्षीच्या तुलनेनं हा आकडा खूपच कमी आहे. 2020 सालात, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत त्यामधून 86 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले होते. त्यानंतर कोरोनाचा काळ सुरु झाला. त्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यात जे काही मेंदूमृत अवयवदान झालेत, त्यामधून 21 रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहेत. यावरून या काळात मेंदूमृत अवयवदान किती झाले आहेत याची प्रचिती येते. ही माहिती राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेकडून प्राप्त झाली आहे, राज्यातील अवयवदान आणि त्या संदर्भातील सर्व गोष्टीवर देखरेख ठेवणारी म्ह्णून संस्था काम करत असते.
कोरोनाच्या काळात हात प्रत्यारोपण सारख्या अधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आली यासाठी डॉक्टरांचे कौतुक केलेच पाहिजे. ह्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांच्या आयुष्यात नवीन उमेद निर्माण केली आहे. आपल्या राज्यात अनेक लोकांचे हात अपघातात गमावलेले आहेत. अनेकांना माहित नाही की, अशा स्वरूपाचे प्रत्यारोपण करता येते. विशेष म्हणजे या शास्त्रक्रियेकरिता येणार खर्च खूप आहे आणि मेंदूंमृत अवयव दान प्रक्रियेत लवकर कुटुंबिय हात दान करायाला तयार होत नाही. हात प्रत्यारोपणाबाबत समाजात जागरूकता खूप कमी आहे. अवयवदानाबाबत प्रचार केला जातो आहे मात्र हाताच्या प्रत्यारोपणाबाबत लोकांना माहितीचं नाही. त्यामुळे शासकीय संस्थांबरोबर यापुढे सामाजिक संस्थांनी हात दानाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे.
संतोष आंधळे यांचे काही महत्त्वाचे ब्लॉग :
- BLOG | मुंबईचा 'कोरोना'!
- BLOG | संसर्ग रोखणे : आव्हान
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा ....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय..
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?
- BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान
- BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?