मुंबई : कोरोनावर मात करुन मुंबईतील वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कमबॅक केलं आहे. सध्याची वाढती कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या पाहता वरळी मतदारसंघातील नेहरु सायन्स सेंटरमध्ये 150 बेड्स तर पोद्दार रुग्णालयात 225 बेड्सचं अद्यावत सोयीसुविधा असलेलं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. या सेंटरचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं.  यामध्ये जवळपास 70 टक्के ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत, त्यामुळे रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. 


उद्घाटन प्रसंगी आदित्य ठाकरे सध्या सुरु असलेल्या राजकारणावर बोलायला विसरले नाहीत. "कोराना काळात जे राजकारण सुरु आहे, ते सुरु राहू द्या, त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे." एवढंच नव्हे तर "लसीवरुन जे काही सुरु आहे त्याबद्दल मी काही सांगायची गरज नाही," असं वक्तव्य त्यांनी केलं. "लवकरच मी फिल्डवर ॲक्टिव्ह होईन," असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.


या कोविड सेंटरमध्ये काय काय आहे? 


150 बेड्स उपलब्ध


70 टक्के ऑक्सिजन बेड्स व्यवस्था 


सेंटरच्या बाहेर योगासाठी गार्डन 


प्रत्येकासाठी लॉकर सिस्टिम 


कुटुंबियांशी व्हिडीओ कॉलवर बोलायला टॅब 


पाणी, जेवण, चहा, बाथरुम 


मोफत वायफाय सुविधा 


दोन ते तीन एलईडी स्क्रीन 




वरळीत जॅम्बो कोविड सेंटर 
वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) इथल्या विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील बेड्सची क्षमता देखील 500 वरुन वाढवून ती आता 800 इतकी करण्यात येत आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे नेहरु विज्ञान केंद्र, पोद्दार रुग्णालय आणि एनएससीआय मिळून एकूण 1175 बेड्स उपलब्ध होऊन कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सोय होणार आहे. नेहरु विज्ञान केंद्रातील कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मुंबई महापालिकेला नयन समुहाने मोठी मदत केली आहे 


आदित्य, रश्मी ठाकरेंना झाली होती लागण
आदित्य ठाकरे यांना मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. "माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करुन घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असं ट्वीट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 20 मार्च रोजी केलं होतं. तर त्यानंतर 23 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांना कोरानाची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते पण थोडा त्रास होत असल्याने त्यांना एच एन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील काही लोकांना कोरानाची बाधा झाली होती. त्यातून आदित्य ठाकरेंनी कोरोनावर मात करत कमबॅक केलं आहे.