Money Laundering Case : अनिल देशमुखांचे पुत्र ईडीच्या रडारवर; आज चौकशीसाठी समन्स; उपस्थित राहणार?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख ईडीच्या रडारवर असून आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आलं आहे.
Money Laundering Case : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक केली आहे. पण देशमुख कुटुंबियांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. ईडीनं अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ईडी (ED) च्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. अनिल देशमुखांचे सर्व पैशांचे व्यावहार मुलगा ऋषिकेश पाहात असल्याचं तपासात उघड झालं आहे, त्यामुळं ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.
ईडीनं गुरुवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावत शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच ऋषिकेश देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. मंगळवारी, पहाटेच्या सुमारास अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. ईडीने विशेष कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
कशी झाली अनिल देशमुखांना अटक?
अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली होती. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख गैरहजर
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :