अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात; कोर्टाने सुनावली चार दिवसांची ईडी कोठडी
Anil Deshmukh sent in ED custody: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए कोर्टाने चार दिवसांची र्इडी कोठडी सुनावली. देशमुख यांची दिवाळी आता तुरुंगातच जाणार आहे.
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार आहे. आज मंगळवारी, पहाटेच्या सुमारास अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली. ईडीने विशेष कोर्टाकडे १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.
कशी झाली अनिल देशमुखांना अटक?
अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत अनिल देशमुख हे त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांच्याशी चर्चा करत होते. रात्री 3 वाजताच्या दरम्यान वकील इंद्रपाल हे देखील ईडी कार्यालयामधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी आपण या अटकेला न्यायालयात विरोध करणार आहोत, अशी माहिती दिली होती. आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख गैरहजर
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.
सोमवारी अनिल देशमुख ईडीसमोर हजर
गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले होते. त्यांनी आपला जबाब ईडीसमोर नोंदवला. तब्बल 13 तास त्यांची चौकशी सुरु होती. अखेर चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले होते.