![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभा अध्यक्षांना पत्रे लिहिली, पण त्यांनी मदत केली नाही : सचिन सावंत
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या एकाही नेत्याने मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी दुःख व्यक्त केलं नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बोलत होते, पण एका खासदाराचा मृत्यू झाला तेव्हा त्याबाबत संवेदना नाही का? असा सवाल विचारला
मुंबई : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज भाजप खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. "भाजपच्या एकाही नेत्याने मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी दुःख व्यक्त केलं नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बोलत होते, पण एका खासदाराचा मृत्यू झाला तेव्हा त्याबाबत संवेदना नाही का?" असं सचिन सावंत म्हणाले. सोबतच "डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मदतीची याचना केली होती, परंतु त्यांना कोणतीही मदत केली नाही," असा दावा केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन सावंत बोलत होते.
"दादरा नगर हवेलीचे दिवंगत खासदार मोहन डेलकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईत आत्महत्या केली. भाजप नेते आणि केंद्रीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्याच्या दीड वर्ष आधी त्यांनी मदतीचा आर्त टाहो फोडला होता. त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. पण त्यांनी मदत केली नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.
डेलकर यांची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दोन तर लोकसभा अध्यक्षांना तीन पत्रे
मोहन डेलकर यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मदतीची याचना केली होती असं सचिन सावंत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "मोहन डेलकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पत्र लिहिली होती. पहिलं पत्र 18 डिसेंबर आणि दुसरं 31 जानेवारी रोजी लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी आपली याचना, होणारे अत्याचार, भाजप नेते आणि अधिकारी अपमान करतात याची माहिती दिली होती. शिवाय हे प्रत्यक्ष सांगण्यासाठी भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना भेट नाकारण्यात आली."
"तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही 18 डिसेंबर आणि 12 जानेवारी रोजी डेलकर यांनी पत्र लिहिलं होतं. एक खासदार मदत मागत असताना त्याला उत्तर दिलं नाही. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना 18 डिसेंबर, 12 जानेवरी आणि 19 जानेवरी अशी तीन पत्र पाठवून मदत मागितली होती. मग कारवाई का केली नाही? जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का?" असे सवाल सचिन सावंत यांनी विचारले.
भाजपच्या एका नेत्याकडून दु:ख व्यक्त नाही : सचिन सावंत
सचिन सावंत म्हणाले की, "भाजपच्या एकाही नेत्याने मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी दुःख व्यक्त केलं नाही. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बोलत होते, पण एका खासदाराचा मृत्यू झाला तेव्हा त्याबाबत संवेदना नाही का? त्यांच्या मृत्यूला जे जबाबदार आहे त्यांचा राजीनामा घेत नाही, आजही ते पदावर आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असेल तर हे मोठं षडयंत्र आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी का पाऊल उचललं नाही? त्यांचे प्राण वाचले असते, पण का वाचवले नाही?"
काँग्रेस हे प्रकरण तडीस लावेल, सचिन सावंत यांना विश्वास
सचिन सावंत पुढे म्हणाले की, "गुजरातमध्ये हरेन पांड्या यांचा खून झाला, तो कोणी केला हे अद्याप सापडलेलं नाही. पण महाराष्ट्र सरकार तशी परिस्थिती मोहन डेलकर यांच्याबाबतीत होऊ देणार नाही. काँग्रेस हे प्रकरण तडीस लावेल."
'पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं'
"मोहन डेलकर यांनी संसदेच्या समितीपुढे गाऱ्हाणं मांडलं होतं. त्या समितीपुढे आत्महत्या करण्याचे सूचित केलं होतं का? हे समितीने स्पष्ट करावं. प्रीव्हिलेज समितीचा अहवाल समोर आला पाहिजे. मोहन डेलकर यांना मदत का केली नाही याचं स्पष्टीकरण सरकार, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे," अशी मागणी सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)