दिवाळीचा बोनस कमी आल्याने कर्मचारी भडकले, टोलनाक्याचे सगळे गेट उघडले अन् गाड्या सुस्साट सोडल्या, 30 लाखांचा टोल बुडवला
धनत्रयोदशीचा दिवस असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठी होती. कर्मचाऱ्यांच्या या कृतीनंतर दोन तासांहून अधिक काळ टोल वसुली पूर्णपणे बंद राहिली.

Lucknow Diwali Bonus:आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस कमी मिळाल्याचं लक्षात येताच संताप व्यक्त करत सर्व टोल गेट उघडले आणि उपोषणाला बसले. या दरम्यान एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या हजारो गाड्या टोल न भरता सुस्साट गेल्यामुळे कंपनीला लाखो रुपयांचा महसुली तोटा झाला असल्याचा अंदाज आहे. हा तोटा सुमारे 30 लाख रुपयांचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. (Toll gates open by Employees)
आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझा 21 वर ही घटना घडली. श्रीसाई आणि दातार कंपन्यांअंतर्गत काम करणारे कर्मचारी दिवाळी बोनस न मिळाल्याने भडकले होते. त्यांचे म्हणणे आहे की गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्यांना आश्वासन देण्यात आले होते की त्यांचा बोनस त्यांच्या खात्यात जमा होईल, परंतु तसे झाले नाही. संतप्त कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री निषेध म्हणून बूम बॅरियर्स (टोल गेट) उघडले आणि टोल प्लाझा येथे धरणे आंदोलन केले.
नेमकं घडलं काय?
घटनेच्या तपशीलानुसार, फतेहाबाद टोल प्लाझा चालवण्याची जबाबदारी ‘श्री साई अँड दातार कंपनी’कडे आहे. या ठिकाणी 21 कर्मचारी काम करत असून, दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी 1,100 रुपये दिले गेले. परंतु कर्मचाऱ्यांचा दावा होता की, मागील वर्षी 5,000 रुपयांचा बोनस मिळाला होता. यावेळी कमी रक्कम मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यवस्थापकांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री 10 वाजता टोल गेटवरील बूम बॅरियर्स उघडले.
धनत्रयोदशीचा दिवस असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठी होती. कर्मचाऱ्यांनी टोल गेट उघडल्याने दोन तासांहून अधिक काळ टोल वसुली पूर्णपणे बंद राहिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान निषेध करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इतरांना कामावर रुजू होऊ दिले नाही. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करून 10 टक्के पगारवाढीचे आश्वासन दिले, त्यानंतरच कामकाज पुन्हा सुरू झाले.
5000 वाहने टोल न भरता गेली
कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा जुरैल यांनीस्पष्ट केलं की, “या घटनेदरम्यान लखनौकडून येणारी सुमारे 5000 वाहने टोल न भरता गेली. वेग जास्त असल्याने फास्टॅग स्कॅन होऊ शकले नाही, त्यामुळे टोल वसुली शक्य झाली नाही.” एक्सप्रेसवेवर एका कारसाठी एकतर्फी टोल ₹665 इतका असल्याने, एकूण नुकसान सुमारे 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले.


















