म्हाडा पेपरफुटी प्रकरण; जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अभाविपची निदर्शने
Mhada Recruitment Paper Leak protest : म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली.
Mhada Recruitment Paper Leak protest : म्हाडा भरती पेपर फुटी प्रकरणी आता राजकारण तापू लागले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, अभाविपच्या या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही तणाव निर्माण झाला होता.
म्हाडातील भरतीसाठी रविवारी परीक्षा होणार होती. मात्र, ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही परीक्षा रद्द होत असल्याची माहिती ट्वीटरवरून दिली. अचानकपणे रद्द झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना होती. परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावरून अनेक विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला होता.
या मुद्यावरूनच आज अभाविपने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. जितेंद्र आव्हाड यांनी भ्रष्टाचार केला असल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आव्हाड पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत असल्याची आरोप अभाविपने केला.
राष्ट्रवादीची ही घोषणाबाजी
अभाविपच्या आंदोलनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूने सुरू असलेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
अभाविप, भाजपला या मुद्यावरून फक्त राजकारण करायचे असल्याचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी म्हटले. म्हाडा भरतीचा पेपर फुटला असल्याचे लक्षात आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नाइलाजाने परीक्षा रद्द करावी लागली होती, असेही परांजपे यांनी म्हटले.
- इतर महत्त्वाची बातमी:
- आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर आता म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन, प्रकरण असं घडलं...
- म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला - जितेंद्र आव्हाड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha