आरोग्य विभागाच्या परीक्षेनंतर आता म्हाडाच्या पेपरफुटीचे मराठवाडा कनेक्शन, प्रकरण असं घडलं...
Mhada Paper Leak issue : आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आले आहे. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे.
Mhada Paper Leak issue : आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आले आहे. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालना मधील दोन आणि औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. आताच्या प्रकरणात औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आले आहे.
या परीक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणले. देशमुख ला अटक केल्यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या घोटाळ्याप्रमाणेच शहरातील दोन क्लासेसचे तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आले.
परीक्षेचे कंत्राट असलेल्या आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याने संतोष हरकळ आणि अंकुश यांच्याबरोबर एकत्र येत लेखी निवड परीक्षेचे काम सोपवले होते. तिघेही सोबतच गाडीत पळून जात असताना पोलिसांनी पकडले असता त्यांच्याकडे पेपर आणि पेनड्राईव्ह आढळून आले.
पुणे पोलिसांनी पेपर फुटी प्रकरणात शहरातील टार्गेट अकॅडमीचा अजय चव्हाण , सक्षम अॅकॅडमीचा संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांना देखील म्हाडाच्या पेपर फुटीप्रकरणात मुख्य आरोपी केले आहे. यापुर्वी ते आरोग्य विभागाच्या घोटाळ्यात देखील आरोपी आहेत. चिकलठाण्यातील मिलेनियक पार्क मध्ये राहणारे , नोकरी करणाऱ्या संतोष लक्ष्मण हरकळ आणि त्याचा भाऊ अंकुश रामभाऊ हरकळ यांच्या मदतीने हे पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. यात रविवारी पोलिसांनी हरकळला अटक केली.
कोण आहे चव्हाण
मागील दहा वर्षांपासून चव्हाण शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करतो. मूळ लोणारचा असलेला चव्हाण ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून गणित, फिजिक्स विषयात शिक्षण घेतले. सुरूवातीला खासगी क्लासेसवर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या चव्हाण ने कालांतराने टिव्ही सेंटर परिसरात ‘द टार्गेट करिअर पाँईंट’ हा क्लास सुरू केला. 1 डिसेंबरपासून आगामी 13 हजार पोलिस भरतीच्या पदांसाठी त्याने स्पेशल बॅच देखील नियोजित केली होती.
गणित व बुध्दिमत्ता मध्ये चव्हाण तज्ञ असून 2019 मध्ये त्याने स्पर्धा परिक्षेच्या बदलल्या पॅटर्नवर आधारीत मास्टर ऑफ मॅथ्स हे पुस्तक देखील प्रकाशित केले. त्याने त्यानंतर पैठण गेट परिसरातील सक्षम एमपीएससी-युपीएससी परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा अंकित चनखोरे आणि कृष्णा जाधव सोबत भागीदारीत क्लासेस सुरू केले. यात शहरातील क्लासेस चालकांच्या माहितीनुसार, कृष्णा नोकरी करत असल्याने चनखोरेला त्याने त्याच्या सक्षमचा संचालक बनवले. म्हाडाच्या पेपर फुटीप्रकरणात त्यांनी जवळपास 45 विद्यार्थ्यांकडून त्यांची प्रवेशपत्र, मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश घेऊन ठेवले होते. मागील चार वर्षांमध्ये चव्हाण क्लासेसच्या यशामुळे अचानक टिव्ही सेंटर भागात चर्चेत आला.
शहरातील वाढते क्लासेस व स्पर्धेमुळे भ्रष्टाचाराचा मार्ग
शहरातील पाच जण राज्यस्तरीय घोटाळ्यात सहभागी असल्याचे समोर आले आणि शहरात खळबळ उडाली. यात जालना, सिल्लोड तालुक्यात देखील पाळेमुळे पसरले. तज्ञांच्या मते, शहरात टिव्ही सेंटर, पैठण गेट भागात कोटा शहराप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक इमारतीमध्ये अभ्यासिका व स्पर्धा परीक्षेचे क्लासेस, मार्गदर्शन केंद्र उघडलेले पहायला मिळते. परिणामी, त्यांच्यात स्पर्धा वाढली व निकाल दाखवण्याच्या ईर्षेने प्राध्यापक थेट घोटाळ्यात सहभागी होऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढलेला दाखतात.यात जवळच्या, विश्वासू विद्यार्थ्यांनाच हे प्राध्यापक यासाठी विचारणा करतात.
संबंधित बातम्या
MHADA Exam : म्हाडाचा पेपर लीक करण्याचा प्रयत्न, चौघं ताब्यात, पुणे सायबर पोलिसांची कारवाई