MHADA Lottery: आनंदाची बातमी! म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती कमी होणार; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची घोषणा
MHADA Lottery : अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे.
MHADA News Updates: आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, गगनाला भिडलेल्या जागेच्या आणि घरांच्या किमतींमुळे प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. पण, आता तुमचं स्वप्न म्हाडा (MHADA) पूर्ण करणार आहे. आता म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Housing Minister Atul Save) यांनी दिली आहे. अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील (MHADA Lottery) पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री सावे यांनी दिली आहे.
अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सरसकट नाहीतर म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्याच किमती कमी होणार असल्याचं अतुल सावे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किंमतीचा आढावा घेणार असून या घरांच्या किंमती कमी करून पुनर्विक्री करणार असल्याचंही यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
म्हाडाच्या सुमारे 11 हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्यानं म्हाडाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याचंही यावेळी मंत्री सावे यांनी सांगितलं आहे. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. अशा तब्बल 11 हजार घरांची कमी किमती करुन पुन्हा विक्री करण्यात येणार असून नुकसान टाळत महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
म्हाडा पुणे मंडळातर्फे 24 नोव्हेंबरची सदनिका सोडत पुढे ढकलली
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5863 सदनिकांच्या विक्रीकरिता 24 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आलं आहे.
म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील 5425 सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील 69 सदनिका, सांगली जिल्ह्यातील 32 सदनिका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 337 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 431 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2584 सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 2445 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.