(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आनंदाची बातमी..! म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त, दसऱ्याला 9 हजार घरांची सोडत निघणार
आनंदाची बातमी..! म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त मिळाला असून यंदा दसऱ्याला 9 हजार घरांची सोडत निघणार असल्याची माहिती म्हाडाच्या वतीनं देण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी... परवडणारं घरं घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकेल. कारण तब्बल तीन वर्ष रखडल्यानंतर म्हाडाच्या सोडतीला अखेर मुहुर्त मिळाला आहे. यंदा दसऱ्याला म्हाडाच्या 9 हजार घरांची सोडत निघणार आहे. त्यामुळे मुंबई लगतच्या भागांत परवडणारी घरं घेण्याचं अनेकांचं स्वप्न साकार होणार आहे. यापूर्वी 2018 साली म्हाडाच्या घरांची सोडत निघाली होती. पंतप्रधान आवास योजनेतील 6500, कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजार तर 20 टक्के योजनेतील 500 घरांचा या सोडतीत समावेश आहे.
यंदा दसऱ्याला म्हाडाच्या 9 हजार घरांची सोडत निघणार असल्याची माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. पण आता मात्र ही सोडत काढण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे. 2018 मध्ये 9018 घरांसाठी सोडत निघाली होती. यंदाच्या दसऱ्याला 9000 घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचं म्हाडाकडून जाहीर करण्यात आलं आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ही घरे असतील. मीरारोड, ठाण्यातील वर्तकनगर, विरारमधील बोळींज, कल्याण, वडवली, आणि ठाण्यातील गोठेघर इथे ही घरं असतील.
मुंबई आणि लगतच्या उपनगरांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण, बऱ्याचदा मुंबईत घरं घेणं परवडत नाही. पण म्हाडाच्या सोडतीमुळं आता ते शक्य होणार आहे.
पाहा व्हिडीओ : यंदाच्या दसऱ्याला म्हाडाच्या 9 हजार घरांची सोडत
म्हाडाच्या घरांची सोडत :
- मिरारोड येथे मध्यम उत्पन्न गटासाठी 196 घरं असून 1 बीएचके आणि 2 बीएचके घरांचा समावेश असणार आहे
- वर्तक नगर, ठाणे येथील अल्प गटातील 67 घरे सोडतीत असून, ही घरे 320 चौ. फुटांची असून या घरांच्या किमती 38 ते 40 लाखांदरम्यान असतील.
- विरार-बोळींजमधील 1300 घरं असणार आहेत. त्यातील सुमारे एक हजार घरं अल्प तर उर्वरित घरं मध्यम गटातील.
- कल्याणमध्ये 2000 घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून, त्याची किंमत 16 लाख रुपये
- गोठेघर, ठाणे –1200 घरं अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून, किंमत 17 लाख रुपये
- वडवलीत 20 घरं, कासारवडवलीत 350 घरं अल्प गटासाठी असून, किंमत 16 लाख