MHADA : म्हाडा कोंकण मंडळाची सोडत लांबणीवर, प्रशासकीय कारणास्तव सोडत पुढे ढकलली
MHADA : म्हाडा कोंकण मंडळाची 13 डिसेंबर रोजी होणारी सोडत ही लांबणीवर गेली असून प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : म्हाडाकडून (MHADA) ठाणे शहर (Thane) आणि जिल्हा, पालघर (Palghar), रायगड (Raigad), सिंधुदुर्ग (Sindhudurg) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5311 सदनिकांची सोडत ही पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती म्हाडाकडून देम्यात आली आहे. तसेच या सोडतीच्या नव्या तारखेसंदर्भात माहिती ही अर्जदारांच्या मोबाईवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकारणाकडून 15 सप्टेंबर 2023 रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता मंडळातर्फे सोडतीत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली. म्हाडाच्या या सोडतीसाठी एकूण 30, 687 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे अनामत रकमेसह 24,303 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारुप यादी दिनांक 04 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात आली. त्याचप्रमाणे या सोडतीसाठीचे स्वीकृत अर्ज हे 11 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या https://housing.mhada.gov.in यावर प्रसिद्ध केली जाईल.
सोडत पाच घटकांमध्ये विभागली
म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1010 सदनिकांचा समावेश करण्यात आलाय. यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणार्या नागरिकांनी PMAY योजनेअंतर्गत नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नोंदणी केली नसल्यास सोडतीतील यशस्वी अर्जदारांनी नोंदणी करणे बंधनकारक राहील.
आवास योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक
प्रधानंमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी जर अर्जदारांनी केली नसेल तर त्यांनी ही नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोंकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या सोडतीमध्ये एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1037 सदनिका, सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजने व्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरिता 20 टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन
नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय प्रणाली अर्जदार अँड्रॉइड (Android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध आहे. ॲन्ड्रॉईड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राईव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल ॲप उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.