BMC : मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गाठला ऐतिहासिक टप्पा, पहिला महाकाय गर्डर यशस्वीपणे बसवला
Costal Road: मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी झाली आहे. कोणत्याही क्रेनशिवाय भरती-ओहोटीचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीनं झालेला हा देशातील पहिला प्रयोग आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा (Mumbai Costal Road) सर्वात महत्त्वाचा टप्पा शुक्रवार पहाटे पूर्ण करण्यात आला. 26 एप्रिलच्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे स्थापन केली गेली.
मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे पुढची 15 वर्ष याला कुठल्याही देखभालीची गरज नसल्याचा कंपनीचा दावा आहे.
मुंबई महापालिकेचा ड्रिम प्रोजेक्ट
खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा सुयोग्य वापर करून कोणत्याही क्रेनची मदत न घेता ही तुळईद्वारे जोडण्याचं शिवधनुष्य एचसीसी कंपनीनं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साथीनं लिलया पेललं. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पहाटे 2 वाजेपासून या कामाला सुरूवात करण्यात आली. तब्बल 30 बोईंग जेटच्या वजनाची ही तुळई योग्य वेळ योग्य ठिकाणी ठेवणं अतिशय महत्त्वाचं होत. न्हावाशेवा येथून 2500 टनाच्या भव्य बार्जवरून ही तुळई इथं दाखल झाली. हिशेब केला या बार्जचं दिवसाचं भाडं 50 लाख रूपये इतकं आहे.
इंजिनिअरिंगची कमाल आणि नियोजन
एकूण 10.58 किलोमीटर लांबीच्या सागरी किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्प्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं अतिशय चोख नियोजन केलं होतं. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) बुधवारी दुपारी 12:30 वाजता माझगाव डॉक येथून मार्गस्थ झाली. ती गुरुवारी पहाटे चार वाजता ती वांद्रे-वरळी सागरी सेतू जवळ पोहोचली.
समुद्राचा प्रवाह, हवामान या सर्वांचा अंदाज घेत पहाटे 2 पासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत एचसीसीच्या अभियंत्यांनी सारं कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत या तळईला स्थिर केलं.
मुंबई किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटींग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक 3 वाजून 25 मिनिटांनी अचूकपणे बसवण्यात आले. चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसवण्यात आली. नंतर हे मेटींग कोन आणि युनिट असलेल्या चारही कोपऱ्यांवर जॅक बसविण्यात येतील. तसेच जॅक कार्यान्वित केल्यानंतर मेटींग कोन आणि युनिट काढून घेण्यात येणार आहेत. पुढच्या तांत्रिक प्रक्रियेत बेअरिंगचा वापर करून त्यावर तुळई स्थिरावणार आहे. त्यानंतर हे जॅकदेखील काढून घेण्यात येतील.
तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास
ही तुळई ही वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली आहे. ही तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून, 136 मीटर लांब आणि 18 ते 21 मीटर रुंद आहे. हरियाणातील अंबाला इथं या तुळईचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले. तिथून तब्बल 500 ट्रेलरच्या मदतीनं हे सुटे भाग मुंबईनजीक दाखल आले. मग हे सारे सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून अजस्त्र तराफाच्या मदतीनं ही तुळई वरळी येथे आणण्यात आली.