(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Measles Outbreak in Mumbai: मुंबईतील गोवर प्रादुर्भावावर मोठी अपडेट, 900 बालके संशयित रुग्ण, महापालिका किती सज्ज?
Measles Outbreak in Mumbai: मुंबई महापालिकेने 900 संशयित गोवर संशयित रुग्ण शोधले असून आरोग्य विभाग सज्ज असल्याचे पालिक आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले.
Measles Outbreak in Mumbai: मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवर (Measles) आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. गोवर आजाराचा वाढता प्रादु्र्भाव लक्षात घेता मुंबई महापालिका सतर्क झाली असून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. मुंबईत सध्या 900 बालके हे गोवर संशयित असून त्यातील काहींना गोवर झाल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे. मुंबईकरांनी चिंता करण्याचे कारण नसून महापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत गोवरचा संसर्ग वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच मुंबईत सोमवारी दुपारी कस्तुरबा रुग्णालयात एक वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत आणखीच भर पडली. त्याशिवाय प्रशासनही अधिक सतर्क झाले आहे. मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
'एबीपी माझा'सोबत बोलताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले की, मुंबईतल्या काही भागामध्ये 19 हजार 200 मुलांनी गोवरची लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. पालिकेने ही बालके शोधली आहेत. त्यापैकी 900 बालके हे गोवर संशयित असून काहींना गोवरची लागण लागली आहे. गोवर बाधितांच्या उपचारासाठी मुंबई महापालिकेकडून कस्तुरबा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्याकडे आरोग्य व्यवस्था सक्षम आहे रोज गोवरचा आढावा घेण्याचं काम सुरु झालं असल्याची माहिती चहल यांनी दिली.
पालिका आयुक्तांनी सांगितले की, आपण 15 हजार रुग्णांना दाखल करून घेऊ शकतो. एवढी क्षमता सध्या मुंबई महापालिकेकडे आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. गोवरच्या संसर्गाचा संभाव्य धोका टळावा यासाठी मुलांचे लसीकरण करण्याचे आवाहन चहल यांनी केले आहे. देशभरातलं वातावरण बदललं आहे. या वातावरण बदलाचा बालकांना त्रास होतो. अनेक पालकांकडून लसीकरणाला नकार दिला जातो. लसीकरणांनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन चहल यांनी धर्मगुरु, नागरिकांना केले आहे. मुंबई महापालिकेचे पथक घराघरात जाऊन गोवर बाधितांची माहिती घेत असून पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात जाऊन लसीकरण होऊ शकते असेही चहल यांनी सांगितले.
मुंबई गोवर बाधितांची संख्या 126 वर
मुंबईत गोवर रुग्णांची संख्या सोमवारपर्यंत 126 इतकी नोंदवण्यात आली. सोमवारी गोवरच्या संशियत रुग्णांमध्ये वाढ झाली. मुंबईतील 12 विभागांमध्ये रुग्णसंख्येची वाढ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व प्रभागात असून गोवंडीत अधिक बाधित आढळले आहेत.