(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Measles Outbreak in Mumbai: मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव! महापालिका अॅक्शन मोडमध्ये; लसीकरण वाढवण्यासाठी उचलणार 'ही' पावलं
Measles Outbreak in Mumbai: मुंबईत वाढत असलेल्या गोवर संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महापालिकेचे अधिकारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
Measles Outbreak in Mumbai: मुंबईत मागील काही दिवसांपासून गोवर (Measles) आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. सोमवारी एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर आता संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) अधिक आक्रमक पावले उचलण्यात येणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार हे वेळात वॉर्ड अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत गोवर आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी आणि लसीकरणावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
या बैठकीत उपाययोजना आणि आढावा घेत लसीकरण वाढवण्यासाठी भर देण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोवर आजाराच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम बचाव असल्याचे म्हटले जात आहे. त्यादृष्टीने लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यावर महापालिका जोर देणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिकेकडून ठिकठिकाणी सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. संशयित गोवर बाधित बाळांना जीवनसत्व 'अ' दिले जाते. तर, आवश्यकता वाटल्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले जाते आहे. मात्र, त्याच वेळेस बाळाचे लसीकरण न करण्यासाठी काही ठिकाणी पालकांकडून आग्रह धरला जात आहे. यासाठी विविध कारणे दिली जात आहेत. अशा ठिकाणी बालकांचे लसीकरण व्हावे यासाठी आता पालिका प्रशासन मौलवींची आणि धर्मगुरुंची मदत घेणार आहे. त्यांच्या उपदेशानंतर लसीकरणात वाढ होईल असे पालिका अधिकाऱ्यांना वाटते.
मुंबई गोवर बाधितांची संख्या 126 वर
मुंबईत गोवर रुग्णांची संख्या 126 वर पोहचली आहे. सोमवारी गोवरच्या संशियत रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचे समोर आल्यानंतर केंद्राकडून याची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील 12 विभागांमध्ये रुग्णसंख्येची वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या एम-पूर्व प्रभागात असून गोवंडीत अधिक बाधित आढळले आहेत.
एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू
मुंबईत गोवरने गंभीर आजारी असलेल्या एक वर्षीय बालकाचा कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी या बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळाच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. शनिवारी प्रकृती आणखी गंभीर झाल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सोमवारी दुपारी या बालकाचे निधन झाले.
गोवरची लक्षणे काय?
गोवरची प्रमुख लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसतात. यामध्ये 104 अंशांपर्यंतचा ताप, खोकला, सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे. गोवरची सुरुवातीची लक्षणे दिसतात. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होतात. त्याच वेळी, 3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलाच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातांवर, पायांवर आणि तळव्यांना येऊ शकतात.