Measles Disease : मुंबईत गोवरचा विळखा! मशिदींमधून अजानसोबत लसीकरणाविषयी माहिती, मात्र 'एका' गोष्टीनं चिंतेत भर
Mumbai Measles Update: मुंबईत लसपात्र वयाआधीच लागण झालेले काही बालक आहेत. अशा बाळांवर उपचार सुरु झाले असले तरी गोवरची लस देण्यात येत नसल्यानं चिंतेचा विषय बनला आहे.
Measles Disease Mumbai : राज्यात गोवरचा प्रादुर्भाव मुंबईसह (Mumbai News) भिवंडी आणि मालेगावात बघायला मिळतोय. मुंबईत गोवरचा विळखा अधिक प्रमाणात आहे. अशात मुंबई महापालिकेनं गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मौलवींना आवाहन केलं आहे. मात्र, लस पात्र वयाआधीच गोवरची लागण होत असल्यानं चिंतेत आणखीच भर पडली आहे. यामुळं काल लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिले आहेत.
मुंबईतील गोवरचा विळखा वाढत असताना मुंबई महापालिकेकडून (BMC) सामाजिक प्रबोधन करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना आणि मौलवींना आवाहन करण्यात आलं होतं. त्यात मुंबईतील अनेक मशिदींवर अजानसोबतच लसीकरणासंदर्भातली माहिती देखील मौलवी देताना बघायला मिळत आहेत. गोवंडी परिसरातील लसीकरणाचा वेग वाढावा याकरीता देखील प्रयत्न होताना दिसत आहेत. आशा सेविका देखील लसीकरण व्हावे यासाठी घराघरात जात सर्व्हेक्षण करत आहेत. पालिकेसोबतच स्थानिक नागरिक देखील लसीकरण व्हावं यासाठी पुढाकार घेतायत.
मुंबईत लसीकरणाचा वेग वाढला असला तरी रुग्णसंख्या देखील वाढती आहे. मुंबईत गोवरचे 169 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 157 रुग्ण हे शून्य ते आठ महिने वय असलेल्या लसपात्र वयाआधीच लागण झालेले आहेत. अशा बाळांवर उपचार सुरु झाले असले तरी गोवरची लस देण्यात येत नसल्यानं चिंतेचा विषय बनला आहे.
लसपात्र वयाआधीच गोवरची लागण!
गोवर लशीची पहिली मात्रा 9 महिने पूर्ण झालेल्या बाळांनाच देण्यात येते
पहिला डोस हा 9 व्या महिन्यात एमआरचा तर दुसरा डोस हा 16 व्या महिन्यात एमएमआरचा देण्यात येत असतो
मात्र, 0-8 महिने वयोगटातील संशयित रुग्ण आढळली तरी त्यांना गोवरची लस सध्या देण्यात येत नाही आहे
मुंबईत 0-8 महिने वयोगटातील बाळांना जीवनसत्व ‘अ’ची मात्रा दिली जात आहे
गोवरमुळे लहान मुलांमधील रोग प्रतिकारशक्ती कमी होते. सोबतच न्युमोनिया, अतिसारसारख्या गंभीर आजारांचा धोकाअसतो. त्यामुळे चिमुकली मुलं आजार आणि कुपोषणाच्या दुष्टचक्रात आढळतात आणि आजार गंभीर होण्याचा धोका अधिक वाढतो.
त्यामुळे प्रशासनाकडून जरी लसीकरणासंबंधी उपाययोजना केल्या जात असल्या तरी पालकांनी देखील खबरदारी घ्यावी. जर मुलाला गोवरची कोणतेही लक्षणं दिसली तरी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधत उपचार करा, असं आवाहन केलं जात आहे.